लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यात कपाशीसह इतर पिकांंवर कीटनाशक फवारणीच्या कामांना वेग आला आहे. त्यामुळे फवारणीतून विषबाधेचे प्रमाणही वाढले आहे. सर्वोपचार रुग्णालयात दिवसाला दाखल होणाºया रुग्णांमध्ये सरासरी चार ते पाच रुग्ण हे फवारणीतून विषबाधा झालेले असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयाच्या वैद्यकीय सूत्रांनी दिली.फवारणीच्या कामांना वेग आला आहे; मात्र अनेक जण विविध प्रकारची रासायनिक औषधे एकत्र करून फवारणी करताना दिसून येतात. तर बहुतांश शेतकरी कोणत्याही प्रकारची सुरक्षात्मक खबरदारी न घेता फवाणी करत असल्याचे आढळून येते. त्यामुळे फवारणीतून विषबाधा होण्याचे प्रमाण जास्त असते. वैद्यकीय सूत्रांच्या माहितीनुसार, पश्चिम विदर्भात अकोल्यासह बुलडाणा, वाशिम व यवतमाळ जिल्ह्यातून विषबाधा झालेले रुग्ण सर्वोपचार रुग्णालयात दाखल होतात. सद्यस्थितीत सौम्य आणि मध्यम प्रभावातील रुग्ण दाखल होतात. हा धोका टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक ती सुरक्षात्मक खबरदारी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले.
विषबाधेचे इतरही रुग्ण!सध्या फवारणीतून विषबाधा झालेले चार ते पाच रुग्ण सर्वोपचार रुग्णालयात दाखल होत आहेत.याच प्रमाणात विष प्राशन करणाºया रुग्णांचाही समावेश आहे. म्हणजेच सर्वोपचार रुग्णालयात दिवसाला सरासरी आठ ते दहा रुग्ण हे विषबाधेचे दाखल होतात.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात दिवसाला सरासरी कॉन्टॅक्ट पॉयझनिंगचे चार रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. येथे उपचारासाठी येणारे रुग्ण हे अकोलासह शेजारच्या बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यातील आहेत.- डॉ. प्रशांत वान्देशकर,सीएमओ, सर्वोपचार