मधमाशांच्या हल्ल्यात दोन युवक गंभीर
पातूर : तालुक्यातील आगीखेड येथे ७ मार्च रोजी सकाळी दोन युवकांवर मधमाशांनी अचानक हल्ला चढविला. यात दोघे गंभीर जखमी झाले. पांगराबंदी येथील गणेश इंगळे व गोवर्धना येथील सचिन महादेव ढोकणे हे दोघे जखमी झाले. त्यांना पातूर येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
बोरगाव मंजू परिसरात नागांना जीवदान
विझोरा : बोरगाव मंजू परिसरात तीन नाग व अन्वी मिर्झापूर परिहरात एका नागाला सर्पमित्र कुमार सदांशिव, सूरज सदांशिव, प्रशांत नागे, योगेश तायडे, सचिन वानखडे, निशांत डोंगरे, प्रफुल्ल सदांशिव यांनी पकडून जंगलात सुरक्षित सोडून दिले.
संगणक परिचालकांच्या मागण्यांसाठी निवेदन
लाखपुरी : संगणक परिचालकांच्या मागण्यांसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहेत. परिचालकांच्या मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीने निवेदन दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, संगणक परिचालक अतुल नवघरे, शुक्राचार्य तेलमोरे, वसंतराव नागे, नितीन सपकाळ उपस्थित होते.
ट्रकची धडक, एक ठार
बाळापूर : वीटभट्टीवरून काम करून परत येत असताना, अज्ञात ट्रकने ३ मार्च रोजी सायंकाळी दीपक अर्जुन निंबाळकर यास धडक दिली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सुभाष निंबाळकर यांच्या तक्रारीनुसार बाळापूर पोलिसांनी ट्रकचालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला.
हिवरखेड येथे साध्या पद्धतीने प्रगटदिन साजरा
हिवरखेड : हिवरखेड विकास मैदानात साध्या पद्धतीने प्रगट दिन साजरा करण्यात आला. यावेळी चिंतामण खिरोडकर, प्रफुल्ल बिजेकार, सुनील ओंकारे, संजय खिरोडकर, सागर उरकडे, रूपेश ओंकारे, कैलास देशकर, भालचंद्र अग्रवाल, संतोष मानकर, धनुष खिरोडकार, दीपक झगडे उपस्थित होते.
मोबाईल नेटवर्क नसल्याने ग्राहक त्रस्त
शिर्ला : परिसरातील भंडारज येथे जिओ, आयडियाचे माेबाईलवर नेटवर्क नसल्याने, ग्राहक त्रस्त झाले आहेत. नेटवर्क नसल्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. यासोबतच इतरांसोबत संपर्क हाेत नसल्याने कामे रखडत आहेत.
पूर्णा नदीपात्रातून रेतीची अवैध वाहतूक
तेल्हारा : तालुक्यातील नेर येथील पूर्णा नदीतून मोठ्या प्रमाणात रेतीची अवैध वाहतूक होत आहे. यामुळे महसूल विभागाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. याकडे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याची मागणी नेर ग्रामस्थांनी केली आहे.
विना मास्क फळांची विक्री
अकोट : शहरातील हातगाडी चालकांकडून विना मास्क फळांची विक्री होत असल्याचे चित्र आहे. प्रशासन मात्र कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहे. सोनू चौक, शिवाजी चौक, अंजनगाव रोडवर फळविक्रेते विना मास्क फळांची विक्री करीत असल्याने कारवाईची मागणी होत आहे.
गॅस सबसिडी देण्याची मागणी
चोहोट्टा बाजार : केंद्र शासनाने सिलिंडर गॅस देण्यात येत असलेली सबसिडी बंद केली आहे. सध्या घरगुती गॅस सिंलिडर दर ५० रुपयांनी वाढविण्यात आले. त्यामुळे गॅसवर मिळणारी सबसिडी केंद्र शासनाने सुरू करून गोरगरिबांना दिलास देण्याची मागणी महिलांनी केली आहे.
धुळीमुळे वाहनचालक त्रस्त
गायगाव : शेगाव मार्गाचे काम सुरू असून, डांबरी रोडचे खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे या मार्गावर धूळ साचली आहे. दररोज उडणाऱ्या धुळीमुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. बांधकाम विभागाने रस्त्याचे काम तातडीने करण्याची मागणी होत आहे.
दुचाकीचा अपघात, तीन जण जखमी
वाडेगाव : खामखेड व बागफाट्यादरम्यानच्या वाघाळी पुलावरून भरधाव दुचाकी खाली कोसळल्याने, तीन युवक गंभीर जखमी झाले. ही घटना ६ मार्च रोजी रात्री १२ वाजताच्या सुमारास घडली. गणेश पळसकर, गोपाल वाघ यांनी युवकांना वाडेगाव आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल केले.