अकोला: जिल्हा परिषदेच्या विशेष पथकाने पातूर तालुक्यातील चार ग्रामपंचायतींच्या कामकाजाची दोन महिन्यांपूर्वी तपासणी करून अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर केला; मात्र त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याने, चार ग्रामपंचायतींच्या तपासणीचा अहवाल अद्याप गुलदस्त्यातच असल्याचे चित्र आहे.
ग्रामपंचायतींकडून वेळेवर कामे होत नाहीत, ग्रामसेवक कार्यालयात उपस्थित राहत नाहीत अशा अनेक प्रकारच्या तक्रारी ग्रामस्थांकडून प्राप्त होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात तक्रारी असलेल्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या कामकाजाची विशेष पथकामार्फत चाैकशी करण्याचा आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी साैरभ कटियार यांनी दिला होता. त्यानुसार विशेष पथकामार्फत पातूर तालुक्यातील आलेगाव, झरंडी, कारला व एक अन्य अशा चार ग्रामपंचायतींच्या कामकाजाची तपासणी करण्यात आली होती. तपासणीचा अहवाल महिनाभरापूर्वी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला होता; परंतु या तपासणी अहवालावर अद्याप कार्यवाही करण्यात आली नसून, तपासणी अहवाल अद्याप गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या विशेष पथकाने चार ग्रामपंचायतींच्या कामकाजासंदर्भात
सादर केलेल्या अहवालावर केव्हा कार्यवाही होणार, याकडे लक्ष लागले आहे.