अकोला: सहकार नगरातील घर फोडून चोरट्यांनी साडेचार लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी कूलरमध्ये गुंगीचे औषध टाकून घरातील ३ लाख ५३ हजाराची रोकड, २00 ग्रॅम चांदीचे शिक्के, ७ ग्रॅमचे सोन्याचे शिक्के, मोबाइल, स्कूटर असा एकूण चार लाख ६५ हजार रुपयांच्या ऐवजावर हात साफ केला. याप्रकरणी खदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सहकार नगरात राहणारे व्यवसायी शरद केशवराव कोकाटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मंगळवारी रात्री ते कुटुंबीयांसह घरातील हॉलमध्ये झोपी गेले. मध्यरात्री २ ते ४ वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागील बाजूस असलेला दरवाजा तोडून आत प्रवेश केला. कोकाटे यांच्या म्हणण्यानुसार चोरट्यांनी कूलरमध्ये गुंगीचे औषध टाकले. एरव्ही पाच वाजता उठणारे कोकाटे कुटुंबीय गुंगीच्या औषधामुळे सात वाजले तरी झोपलेलेच होते. शरद कोकाटे यांना जाग आल्यावर त्यांचे डोके जड आणि डोळे भारी पडल्याचे जाणवले. काही वेळानंतर घरातील शयनकक्षात जाताच, त्यांनी चोरट्यांनी घरात चोरी केल्याचे लक्षात आले. शयनकक्षातील कपाटातील ३ लाख ५३ हजार रुपयांची रोकड, २00 ग्रॅमचे १0 नग चांदीचे शिक्के, ७ ग्रॅमचे ४ नग सोन्याचे शिक्के, २६ हजार रुपये किमतीचा मोबाइल आदी ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचे दिसून आले. त्यांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचून घराची पाहणी केली. घटनास्थळाला शहर पोलीस उपअधीक्षक प्रदीप चव्हाण, ठाणेदार छगनराव इंगळे यांनी भेट दिली. शरद कोकाटे यांच्या तक्रारीनुसार, खदान पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
सहकार नगरात साडेचार लाखांची घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2016 2:18 AM