अकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मलकापूर परिसरात असलेल्या कोठारी वाटिका क्रमांक ४ मध्ये रहिवासी असलेल्या महिला सहायक पोलीस निरीक्षक यांच्या निवासस्थानी चोरट्यांनी प्रवेश करून चार लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. याप्रकरणी खदान पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.महिला सहायक पोलीस निरीक्षक वीणा राहुल भगत या प्रसूती रजेवर असून, कोठारी वाटिका क्रमांक ४ मधील वैभव रेसिडन्सी येथे राहावयास आहेत; मात्र रविवारी चोरट्यांनी त्यांच्या या निवासस्थानाचे कुलूप चावीने उघडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटातील रोख ९६ हजार रुपये, सोन्याचे दागिने १३ तोळे असा एकूण चार लाखांचा मुद्देमाल लंपास केला. वीणा यांचे पती राहुल भगत यांचा बांधकाम व्यवसाय असून, त्यांची आई व वडील दोघेही मोठी उमरी येथे राहत असल्याने ते दोघेही आई वडिलांकडे गेलेले असताना चोरट्यांनी ही चोरी केली. याप्रकरणी खदान पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. खिडकीत ठेवलेली चावी घेऊन केला प्रवेशवीणा व राहुल भगत दोघेही मोठी उमरी येथे जात असताना त्यांनी घराला कुलूप लावल्यानंतर ती चावी त्यांच्याच घराच्या खिडकीत ठेवली होती. नेमकी हीच चावी चोरट्यांच्या हातात लागल्यानंतर भगत यांच्याच चावीने त्यांचे घर उघडून चोरट्यांनी आत प्रवेश करून चार लाखांचा मुद्देमाल पळविला. यावरून चोरट्याने त्यांच्यावर पाळत ठेवल्याची माहिती समोर येत आहे.