अकोला: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाला नेत्र चिकित्सा शास्त्र विभागांतर्गत पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (पीजी) आणखी चार जागांना भारतीय वैद्यकीय परिषदने (एमसीआय) मान्यता दिली आहे. त्यामुळे येथील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या एकूण जागा ३० वर गेल्या आहेत.येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला वर्ष २०१४-१५ या शैक्षणिक वर्षापासून पहिल्यांदाच पदव्युत्तर अभ्यासक्रमांची मान्यता मिळाली होती. त्यावेळी औषध निर्माण शास्त्र आणि सूक्ष्मजीवशास्त्र या दोन अभ्यासक्रमांना एमसीआयने मान्यता दिली होती. त्यानंतर २०१५-१६ च्या शैक्षणिक वर्षात न्याय वैद्यकशास्त्र, जीवरसायनशास्त्र, स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र, विकृतीशास्त्री, शरीरक्रियाशास्त्र या पाच नव्या अभ्यासक्रमांना एमसीआयकडून मान्यता मिळाली होती. तर २०१७-१८ मध्ये शरीररचनाशास्त्र, जनऔषधशास्त्र आणि चर्मरोगशास्त्र हे तीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आले होते. यानंतर अकोला जीएमसीतर्फे नेत्र चिकित्सा शास्त्र विषयासाठी पदव्युत्तर अभ्यासक्रमाची मागणी केली होती. या मागणीनंतर २०१९ मध्ये भारतीय वैद्यकीय परिषदेच्या एका पथकाने येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी करून, या विषयाच्या चार जागांना मंजुरी दिली. नवीन शैक्षणिक सत्रापासून अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती महाविद्यालय प्रशासनातर्फे देण्यात आली.
पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या वाढीव जागांसाठी एमसीआयकडे मागणी करण्यात आली होती. एमसीआयने महाविद्यालयाला भेट दिल्यानंतर नेत्र चिकित्सा विभागातील चार जागांना मंजुरी दिली आहे.- डॉ. शिवहरी घोरपडे,अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला