अकोला : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवनी खदान येथील रहिवासी एका ऑटो चालकावर चार जणांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना शुक्रवारी घडली. या हल्ल्यात ऑटोचालक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
अरुण रामजी बलखंडे असे ऑटो चालकाचे नाव आहे. या ऑटो चालकास विशाल पाखरे व त्याचा भाचा आकाश खंडारे आणि त्यांचे दोन अन्य साथीदारांनी क्षुल्लक कारणावरून लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. या मारहाणीत अरुण बलखंडे गंभीररीत्या जखमी झाले असून, त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून, प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अरुण बलखंडे यांचे बयान घेतल्यानंतर आरोपी विशाल पाखरे, आकाश खंडारे व त्यांचे दोन साथीदार यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.