३२६ जणांनी केली काेराेना चाचणी
अकाेला : शहराच्या विविध भागात काेराेनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम आहे. काही दिवसापासून काेराेना बाधित रुग्णांची संख्या कमी झाली आहे. दरम्यान, काेराेनाची लक्षणे आढळून येणाऱ्या ३२६ जणांनी मंगळवारी चाचणी केली़ यामध्ये २२ जणांनी आरटीपीसीआर व ३०४ जणांनी रॅपिड अँटिजन चाचणी केली़ संबंधितांचे अहवाल चाचणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे पाठविण्यात आले आहेत.
वारीसाठी परवानगी द्या!
अकोला : महाराष्ट्रातील भाविकांचे आराध्यदैवत विठ्ठल-रुक्माई यांच्या दर्शनासाठी परवानगी देण्याची मागणी जिल्ह्यातील वारकरी संप्रदायातून केली जात आहे. २० जुलै राेजी आषाढी एकादशी असून त्यानिमित्ताने काेराेना नियमांचे पालन करून वारीसाठी परवानगी देण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.
सालासर बालाजी मंदिरात महाप्रसाद
अकोला : श्री रामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने शहरातील मिनी बायपासलगतच्या प्रसिद्ध सालासर बालाजी मंदिर परिसरात २७ मार्च ते २८ एप्रिल ते हनुमान जयंतीपर्यंत रामनवमीच्या पर्वावर १३ कोटी ६५ लाख हनुमान चालीसा पठणाचे आयाेजन केले हाेते. यामध्ये शहरातील असंख्य भक्तांनी सहभाग घेतला हाेता. त्यानिमित्त साेमवारी २८ जून रोजी महाप्रसादाचे आयाेजन करण्यात आले हाेते.
न्यू तापडियानगर-खरप रस्त्याची दुरवस्था
अकोला : प्रभाग क्रमांक ३ मधील न्यू तापडियानगर ते खरप या मुख्य रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. गेल्या दीड वर्षांपासून रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू असून वाहनांची वर्दळ असल्याने हा रस्ता खराब झाला आहे. या मार्गावर माेठ्या प्रमाणात वाहतूक हाेते. खड्ड्यांमुळे वाहनचालकांच्या जीवितास धाेका निर्माण झाला असून, याची मनपा प्रशासनाने दखल घेण्याची गरज आहे.
आयुक्तांकडून रस्ते पाहणी
अकाेला : प्रभाग क्रमांक १ अंतर्गत असलेल्या नायगाव परिसरात मूलभूत सुविधांची दाणादाण उडाल्याची परिस्थिती आहे. नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. नगरसेविका अजरा नसरीन मकसूद खान यांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेत, मनपा आयुक्त निमा अराेरा यांनी नायगावातील रस्त्यांची पाहणी केली.