अकोला - चोहोट्टा बाजार येथील पोलीस चौकीसमोर असलेल्या दोन ज्वेलर्समध्ये धाडसी चोरी करण्यात आली होती. या चोरीनंतर दोनच दिवसात जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले. या चार पोलीस कर्मचाºयांच्या निलंबनाचा आदेश सोमवारी देण्यात आला.दहीहांडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोहोट्टा बाजार पोलीस चौकीत कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी महल्ले, जावेद, अनिल तेलगोटे व शिरसाट या चार कर्मचाºयांना कर्तव्यात कसूर केल्यामुळे निलंबित करण्यात आले आहे. चोहोट्टा बाजार येथील मंगेश अरुण कराळे यांचे चोहोट्टा येथील मुख्य मार्गावर पोलीस चौकीच्या समोर असलेले शोरूम व चौकीच्या मागील बाजूस विनोद तळोकार यांच्या रूपसंगम ज्वेलर्सला शुक्रवारच्या पहाटे अज्ञात चोरट्यांनी लक्ष्य केले होते. या दुकानाचे मुख्य गेट अतिशय मजबूत असतानाही चोरट्यांनी ते गॅस कटरच्या साहाय्याने फोडल्यानंतरही पोलिसांना मात्र जाग न आल्याने आश्यर्च व्यक्त करण्यात येत होते. चोरट्यांनी दोन ज्वेलर्सचे दरवाजे, गेट तोडल्यानंतरही त्यांना आतमध्ये प्रवेश न करता आल्यामुळे हा चोरीचा प्रयत्न अयशस्वी झाला होता; मात्र ही घटना पोलीस चौकीसमोर घडल्याने पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होते. कर्तव्यावर असणाºया कर्मचाºयांची पोलीस अधीक्षकांनी चांगलीच खरडपट्टी काढली होती, तर त्यानंतर सोमवारी या पोलीस चौकीतील चार पोलीस कर्मचाºयांचे निलंबन करण्यात आले आहे.