अकोला: अक्षय्य तृतियेच्या दिवशी कापशी तलाव येथील गावकर्यांना पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणप्रकरणी अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकांत उघडे यांच्या आदेशानुसार रविवारी चार पोलीस कर्मचार्यांना निलंबित करण्यात आले. लोकमतने या प्रकरणाचा प्रभावी पाठपुरावा केला होता. परिणामस्वरूप तत्कालीन साहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांची आधी बदली आणि आता त्यांच्या अँन्टी गुंडा स्क्वॉडमधील चौघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. निलंबित केलेल्या पोलीस कर्मचार्यांमध्ये शक्ती कांबळे, दीपक मुदीराज, कुणाल सोनोने, इरफान खान यांचा समावेश आहे. अक्षय्यतृतीयेच्या दिवशी (२१ एप्रिल) पोलिसांनी कापशी तलाव येथे जुगार अड्डय़ावर छापा टाकला होती. ही कारवाई फसल्याने पोलिसांनी त्याच दिवशी रात्रीच्या वेळी गावात घुसून अक्षरश: हैदोस घातला होता. पोलिसांनी निष्पाप ग्रामस्थांना अमानूष मारहाण केली. यात अनेक महिला, पुरुष जखमी झाले होते. एवढेच नाहीतर ग्रामस्थांच्या घरांमध्ये घुसून त्यांच्या घरातील साहित्य, तसेच वाहनांची तोडफोड केली होती. लोकमतने पोलिसांचे हे कृत्य अत्यंत प्रभावीपणे मांडून, त्याचा पाठपुरावाही केला होता. या गंभीर प्रकाराची दखल घेत, जिल्हय़ाचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यासह आ. गोवर्धन शर्मा, विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकांत उघडे यांनी कापशी गावाला भेट देऊन ग्रामस्थांची चौकशी केली होती. त्यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनी चौकशी करून चार पोलीस कर्मचार्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव आयजी उघडे यांच्याकडे पाठविला. उघडे यांच्या आदेशानुसार पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी रविवारी अँन्टी गुंडा स्क्वॉडमधील चार पोलीस कर्मचार्यांना निलंबित केले.
*अधिकार्यांना वाचविण्यासाठी कर्मचार्यांचा बळी?
कापशी येथे जुगारावर छापा घालण्यासाठी गेलेल्या तत्कालीन साहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांच्या नेतृत्वातील अँन्टी गुंडा स्क्वॉडला जुगार खेळणार्यांनी मारहाण केली. त्यानंतर डॉ. मुंडे यांनी अतिरिक्त पोलीस कुमक बोलावून जुगार खेळणार्या आरोपींनी केलेल्या मारहाणीचा बदला निष्पाप कापशी ग्रामस्थांना मारहाण आणि त्यांच्या घरातील साहित्याची, मोटारसायकलींची तोडफोड करून घेतला. डॉ. मुंडे व इतर अधिकार्यांच्या आदेशावरूनच पोलीस कर्मचार्यांनी कापशीमध्ये धुडगूस घालून ग्रामस्थांना बेदम मारहाण केली होती. परंतु वरिष्ठांनी डॉ. मुंडे व इतर पोलीस अधिकार्यांना वाचविण्यासाठी चार कर्मचार्यांचा बळी दिल्याची चर्चा पोलीस दलात सुरू आहे.
*लोकमतचा पाठपुरावा
कापशी ग्रामस्थांवर पोलिसांनी केलेल्या अत्याचाराचे ह्यलोकमतह्णने प्रभावी वृत्तांकन करून शासनाला कापशी प्रकरणाची दखल घेण्यास भाग पाडले होते. एवढेच नव्हे तर, या प्रकरणाचा ह्यलोकमतह्णने प्रभावी पाठपुरावाही केला. परिणामस्वरूप गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकांत उघडे यांना कापशी ग्रामस्थांची भेट घ्यावी लागली. ह्यलोकमतह्णमुळेच कापशी गावातील पोलिसी अत्याचार राज्यभर पोहोचला आणि याप्रकरणी तत्कालीन सहाय्यक पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांची बदली आणि त्यांच्या स्क्वॉडमधील चार पोलीस कर्मचार्यांना शासनाला निलंबित करावे लागले.