अकोला, दि. १८- ग्रामीण भागातील पाणीपुरवठय़ाची कायमस्वरूपी सोय म्हणून मुख्यमंत्री पेयजल योजनेसाठी जिल्हय़ातून निवड केलेल्या व निधी मंजूर असलेल्या १६ पैकी दहा योजनांचे अंदाजपत्रक शासनाने बुधवारी नामंजूर केले. त्या योजनांच्या खर्चात कपात करून नव्याने सादर करण्याचे निर्देश देण्यात आले, तर रद्द केलेल्या चार योजनांसाठी नव्याने प्रस्ताव सादर करण्यात येणार आहेत. सोबतच उर्वरित दोन गावांचे प्रस्तावही आता सादर केले जाणार आहेत. मुख्यमंत्री पेयजल कार्यक्रम २0१६-१७ ते २0१९-२0 या वर्षात राबविण्यात येत आहे. त्यासाठी राज्यात नव्याने घेण्यात येणार्या एकूण १00३ योजनांपैकी ९७२ स्वतंत्र योजना आहेत, तर ३१ योजना प्रादेशिक आहेत. त्यामध्ये अकोला जिल्हय़ातील १६ योजनांचे प्रस्ताव मंजूर आहेत. त्यासाठी शासनाने निधी खर्चाची र्मयादा ठरवून दिली. त्या र्मयादेत प्रस्ताव सादर करण्याचे मे २0१६ मध्येच निर्देश देण्यात आले. त्यानुसार जिल्हा परिषदेने दहा योजनांसाठी ११ कोटी ६१ लाख रुपये खर्चाचे प्रस्ताव सादर केले. त्याची पडताळणी बुधवारी राज्याच्या पाणीपुरवठा विभागात करण्यात आली. त्यामध्ये ते सर्व प्रस्ताव परत करण्यात आले. त्यामुळे ते नव्याने सादर करण्याची वेळ जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागावर आली आहे.चार योजनांचे प्रस्ताव आधीच रद्द शासनाने मंजूर केलेल्या १६ पैकी चार गावांचे प्रस्ताव आधीच रद्द झाले आहेत. त्यामध्ये कानशिवणी, कोळंबी व वाशिंबा या गावातील स्वतंत्र पाणीपुरवठा योजना आहेत, तर तपलाबादचा समावेश महापालिकेत झाल्याने ते रद्द झाले. त्याऐवजी आता चिखलगाव, खडकी-टाकळी, कुरणखेड, चांदूर या गावांचा प्रस्ताव तयार केला जाणार आहे. घरगुती नळांचा खर्च कपातीसाठी परत शासन निर्णयात आधी घरगुती नळ योजनेचा खर्च जोडण्याचे आदेश होते. तो खर्च कमी करण्याचे आता बजावण्यात आले. योजनांचे प्रशासकीय अंदाजपत्रक दहा टक्के अधिक खर्चाचे तयार केले. ते कमी करा. हस्तांतरणापूर्वी योजना तीन महिने प्रायोगिक तत्त्वावर चालविण्यासाठी कंत्राटदाराला लागणारा खर्च अंदाजपत्रकात वाढवा, तशी दुरुस्ती करूनच प्रस्ताव सादर करण्याचे बजावण्यात आले आहे. या योजनांचे प्रस्ताव आले परतशासनाने जिल्हा परिषदेला परत केलेल्या प्रस्तावांमध्ये चान्नी, मनब्दा, गायगाव, दगडपारवा, सारकिन्ही, सोनाळा, अन्वी, पुनोती, गोरेगाव बुद्रूक, कोठारी या गावांचा समावेश आहे. या गावातील स्वतंत्र पाणीपुरवठा योजनांसाठी ११ कोटी ६१ लाख रुपये खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते.
पाणीपुरवठा योजनेचे चार प्रस्ताव रद्द
By admin | Published: January 19, 2017 2:51 AM