अकोला : आगामी नाताळ सणानिमित्त होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने पुणे व अजनी दरम्यान साप्ताहिक विशेष सुपरफास्ट एक्स्प्रेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. अप व डाऊन मार्गावर प्रत्येक दोन अशा एकूण चार फेऱ्या होणार असून, या गाडीला अकोल्यात थांबा असल्याने अकोलेकर प्रवाशांची सोय होणार आहे.
मध्य रेल्वेच्या भूसावळ विभाग प्रबंधक कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, ०१४६५ पुणे-अजनी साप्ताहिक सुपरफास्ट एक्स्प्रेस २६ डिसेंबर २०२३ आणि २ जानेवारी २०२४ रोजी पुणे स्थानकावरून १५:१५ वाजता रवाना होऊन दुसऱ्या दिवशी ०४:५० वाजता अजनी येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात ०१४६६ अजनी-पुणे साप्ताहिक सुपरफास्ट एक्स्प्रेस २७ डिसेंबर २०२३ आणि ३ जानेवारी २०२४ रोजी अजनी स्थानकावरून १९:५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ११:३५ वाजता पुण्याला पोहोचेल.
या गाड्यांना दौंड कॉर्डमार्ग, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, नांदुरा, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या स्थानकांवर थांबा असणार आहे. एलएचबी कोचसह धावणऱ्या या एक्स्प्रेसला २० डबे असून, तीन एसी-२ टियर, १५ एसी ३-टियर आणि २ जनरेटर व्हॅन अशी संरचणा आहे. या एक्सप्रेससाठी विशेष शुल्कावरील बुकिंग २१ नोव्हेंबर रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर उघडेल.