अकोला, दि. १३ : अहमदनगर जिल्हय़ातील कोपर्डी येथील मुलीवर झालेला अनन्वित अत्याचार आणि तिच्या हत्याकांडाचा निषेध, सकल मराठय़ांना गोवण्यासाठी विनाकारण होत असलेला अँट्रॉसिटी अँक्टचा वापर, मराठा आरक्षण आणि मराठा समाजावर होत असलेल्या अन्याय, अत्याचाराविरोधात अकोला जिल्हय़ातील सकल मराठय़ांचा सोमवार, १९ सप्टेंबर रोजी मराठा क्रांती महामोर्चा निघणार आहे. या मोर्चाची पूर्वतयारी बैठक कौलखेड चौकामध्ये सोमवारी पार पडली असून, बैठकीला सकल मराठा समाजातील तब्बल ४ हजारांवर महिला-पुरुषांची उपस्थिती होती.अकोला क्रिकेट क्लब मैदानावरून १९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता हा मोर्चा निघणार असून, दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. मराठा क्रांती महामोर्चाची पूर्वतयारी बैठक हजारो सकल मराठय़ांच्या उपस्थितीत सोमवारी सायंकाळी कौलखेड चौकामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी पंकजपाल महाराज यांनी मराठय़ांवर होत असलेल्या अन्यायांसदर्भात मार्गदर्शन केले. त्यानंतर मराठा क्रांती महामोर्चाचे नियोजन करण्यात आले. मराठा समाजातील हजारो प्रतिष्ठितांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत मोर्चासंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी सकल मराठा समाजातील प्रतिष्ठित, आजी-माजी लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटनांचे जिल्हाध्यक्ष, शिक्षक, डॉक्टर, पत्रकार, अभियंता, विद्यार्थी, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अधिकारी-कर्मचारी, व्यावसायिक, उद्योजक यांसह सर्वच क्षेत्रांतील मराठय़ांची मोठय़ा प्रमाणात उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सकल मराठा समाज कौलखेड परिसर यांनी अथक परिश्रम घेतले.
कौलखेडमधील बैठकीला चार हजारांवर मराठे!
By admin | Published: September 14, 2016 2:00 AM