अकोला: मोबाईल ग्राहकांना फोर-जी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मनपा प्रशासनाने एक नव्हे तर दोन मोबाईल कंपन्यांसोबत करार केले. दुसरा करार नेमका कधी झाला, याबाबत प्रशासनासोब तच नगरसेवकांनीही चुप्पी साधली आहे. महापालिका प्रशासनासोबत फोर-जी सुविधेचा करार रिलायन्स जीओ एन्फोकॉम कंपनीकडून करण्यात आला. २0१३ मध्ये मनपाचे तत्कालीन आयुक्त दीपक चौधरी यांनी अवघ्या ८ कोटी ३७ लाखात कंपनीसोबत करार केला होता. या करारावर आक्षेप घेत, तत्कालीन महापौर ज्योत्स्ना गवई यांनी हा करार रद्द करण्याचे निर्देश विशेष सभेत दिले होते. यानंतर आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी १३ कोटींमध्ये रिलायन्स कंपनीसोबत खोदकामाचा करार केला. लेखी करार होताच, कंपनीने शहरात खोदकामाला सुरुवातही केली. खोदकामादरम्यान शहरातील जलवाहिन्या, दूरसंचार विभागाच्या केबल्स व रस्त्यांची तोडफोड केल्यास त्या तत्काळ दुरुस्त करण्याची जबाबदारी कंपनीकडे होती; परंतु झाले नेमके उलटेच, जलवाहिन्यांसह चक्क सिमेंट काँक्रीट रस्त्यांची तोडफोड करण्यात आली. जलवाहिन्यांची दुरुस्ती होत नसतानाच, गोरक्षण रोडवर भलतीच मोबाईल कंपनी फोर-जीचे खोदकाम करीत असल्याचे समोर आले. संबंधित कंपनीसोबत मनपाने ५५ लाख रुपयांत करार केल्याची माहिती आहे; परंतु हा करार नेमका कधी करण्यात आला, हा विषय मनपाच्या सभागृहात का ठेवण्यात आला नाही, यावर प्रशासनाने आजपर्यंत चुप्पी साधली आहे.
फोर-जीचे एक नव्हे दोन करार!
By admin | Published: October 08, 2014 1:07 AM