अकोला: सध्या सोशल मीडियाचा प्रभाव आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्राला व्यापून टाकत आहे. या सोशल मीडियामुळे दोन समाजात, दोन धर्मात तेढ निर्माण होण्यापासून तर याच्या अतिरेकी वापरामुळे संसारही तुटण्याचे प्रसंग समोर आले आहेत; मात्र याच सोशल मीडियाचा सकारात्मक वापर केला तर जीवनदान मिळू शकते याचे प्रत्यंतर अकोल्यात आले आहे. ए निगेटिव्ह या रक्ताची गरज सर्वोपचार रुग्णालयाला होती. त्याची माहिती व्हॉट्स अँपवरून फिरल्यामुळे तब्बल आठ रक्तदाते रुग्णालयात उत्स्फूर्तपणे दाखल झाले व चार रुग्णांचे प्राण वाचले. अकोल्याच्या जिल्हा रुग्णालयात रेखा मोहन गोंधळे ही बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा येथील गरीब कुटुंबातील महिला स्त्री कक्षात उपचार घेत आहे. १३ जुलै रोजी रेखाला बाळंतपणासाठी अकोल्याच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. १४ ला सकाळी रेखाला प्रसवकळा सुरू झाल्यानंतर तिला प्रसूती कक्षात नेण्यात आले; मात्र रेखाचे गर्भाशय आतमध्येच फुटले अन् तिची प्रकृती गंभीर झाली. यामुळे बाळही पोटात दगावले. महत्प्रयासाने मृत बाळ बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले; परंतु यादरम्यान, रेखाचा रक्तस्राव खूप झाल्याने तिला बाहेरून तातडीच्या रक्तपुरवठय़ाची आवश्यकता निर्माण झाली होती. रेखाचा रक्तगट ए निगेटिव्ह होता. जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीसह अनेक खासगी रक्तपेढय़ांमध्ये या गटाचे रक्त उपलब्ध नव्हते त्यामुळे डॉक्टरांसमोर मोठे संकट व नातेवाइकांपुढे रेखाच्या जीवन-मरणाचा प्रश्न उभा ठाकला. तर दुसरीकडे आणखी एक रुग्ण कुबराबानो या महिलेचीही प्रसूती अडली होती तिलाही ह्यएबी निगेटिव्हह्ण रक्ताची आवश्यकता होती. या दोन्ही रुग्णांच्या जीवन-मरणाचा प्रश्न समोर असल्याने जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीच्या प्रमुख डॉ. सुवर्णा पाटील यांनी ए निगेटिव्ह रक्तगटाची गरज असल्याचा संदेश रुग्णालयातील आपल्या सहकार्यांच्या ह्यव्हॉट्स अँप ग्रुपह्णवर टाकला. याच ग्रुपवर शासकीय वैद्यकीय महाविद्याचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते हे सुद्धा होते ते १४ जुलै रोजी मुंबईत कार्यालयीन बैठकीसाठी गेले होते. त्यांनी हा व्हॉट्स अँप संदेश वाचताच अकोल्यातील इतर अनेक व्हॉट्स अँप ग्रुपवर फॉरवर्ड केला अन् पुढच्या दोन तासांत अक्षरश: चमत्कार झाला. या दोन तासांत एक-दोन नाहीतर ए आणि एबी निगेटिव्ह रक्तगट असलेले तब्बल आठ रक्तदाते स्वत:हून रक्तदानासाठी शासकीय रुग्णालयात हजार झाले. त्यांनी रक्तदान केले. या दोन्ही महिलांना वेळीच रक्त मिळाले अन् त्यांचा जीव वाचला. दरम्यान, याच रक्तगटाची गरज रुग्णालयात दाखल असलेल्या आणखी एका सिकलसेलग्रस्त छोट्या मुलीलाही कमी आली. अशाप्रकारे या रक्तदानाने दोन माता, कुबराबानो यांचे बाळ आणि एका सिकलसेलचा रुग्ण अशा चार जणांचे प्राण वाचले. व्हॉट्स अँपच्या एक व्हायरल झालेल्या मेसेजमुळे आपण चार जणांना जीवन देऊ शकलो याचा मोठा आनंद रुग्णालयातील डॉक्टरांना आहे.
व्हॉट्स अँप मॅसेजने वाचविले चार ‘प्राण’!
By admin | Published: July 18, 2016 2:11 AM