अकोला, दि. ३0- महानगरपालिका निवडणुकीसाठी २७ जानेवारीपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असली, तरी गेल्या तीन दिवसांत एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. अखेर चौथ्या दिवशी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून, सोमवारी संध्याकाळपर्यंत पाच नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले होते. मनपाच्या निवडणूक विभागाकडून शहरातील पाच ठिकाणी क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. क्षेत्रीय कार्यालयनिहाय ठरवून दिलेल्या प्रभागांमधून सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. सोमवारी झोन क्रमांक १ अंतर्गत प्रभाग क्रमांक १ -ड या जागेकरिता महेबूब खॉ शेर खॉ अपक्ष यांचे एक नामनिर्देशन पत्र दाखल झाले, तर झोन क्रमांक २ अंतर्गत प्रभाग क्रमांक ३ -ड या जागेकारिता राजेश किशन शेगोकार अपक्ष यांचे एक नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले आहे. झोन क्रमांक ३ अंतर्गत प्रभाग क्रमांक ९ -ड या जागेकरिता शहा मोहम्मद रफीक युसूफ यांचे दोन, झोन क्रमांक ४ अंतर्गत प्रभाग क्रमांक १२-ड या जागेकरिता सुभाष मधुकर इंगळे अपक्ष यांचे एक नामनिर्देशन पत्र दाखल झाले. महापालिका निवडणुकीसाठी यंदा प्रथमच उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरावे लागणार आहेत. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंटआउट काढून ती निवडणूक कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे सादर करावी लागेल. यावेळी आवश्यक दस्तावेजांची पूर्तता (स्वाक्षांकित प्रती) करणे क्रमप्राप्त आहे.
चौथ्या दिवशी पाच नामनिर्देशन पत्र दाखल
By admin | Published: January 31, 2017 2:19 AM