अकोला : मयत पित्याच्या नावावरील भूखंड स्वत:च्या नावावर करण्यासाठी चुलते व चुलत भावांसोबत संगनमत करून मयत पित्याच्या जागेवर दोन वृद्धांना उभे करून बनावट कागदपत्रे तयार करून जिल्हा परिषद सदस्य राजेश भीमराव खोणे यांनी शासनाची फसवणूक केल्याचा आरोप देवी पोलीस लाइन येथे राहणारे राजेश रमेश पाटील यांनी केला. त्यांनी जि.प. सदस्य खोणे यांच्याविरुद्ध हिवरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली; परंतु पोलिसांनी अनेक महिने उलटूनही त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला नाही. राहुल पाटील यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये, दानापूर येथील नझुल क्र. ३ प्लॉट क्र. ६३८ क्षेत्रफळ १४९.७ चौ.मी. जागेपैकी उत्तरेकडील २५.१0 चौ.मी. जागा जि.प. सदस्य राजेश भीमराव खोणे यांनी जागेचे मालक नथ्थू रामचंद्र खोणे, बळीराम रामचंद्र खोणे, भीमराव रामचंद्र खोणे आणि अर्जुन रामचंद्र खोणे यांच्याकडून १९ जुलै २0११ रोजी दुय्यम निबंधक हिवरखेड येथे खरेदी केली; परंतु यातील भीमराव खोणे हे २ डिसेंबर २00२ मध्येच मरण पावले असतानाही जि.प. सदस्य खोणे यांनी त्यांच्या मयत पित्याच्या जागेवर गावातीलच गोपाळ जानोजी वाकोडे यांना दुय्यम निबंधकांच्या समोर उभे केले व खरेदीखत नोंदविताना मयत भीमराव खोणे यांचे खरेदीवर छायाचित्र चिकटवून वाकोडे यांचा अंगठा घेऊन बनावट कागदपत्रे तयार केल्याचा आरोप केला. तसेच तक्रारीमध्ये वडील मयत असल्याचे माहीत असूनही गजानन शिवाजी बावने, शे.जमीर शे.शब्बीर यांनी साक्षीदार म्हणून खरेदीवर स्वाक्षरी केली. एवढेच नाही तर राजेश खोणे यांनी गजानन बावने, शे.जमीर, संजय खोणे, मुरलीधर खोणे, गिरीधर खोणे, अर्जुन खोणे आणि बळीराम खोणे यांच्याशी संगनमत करून भूमीअभिलेख कार्यालय व दानापूर ग्रामपंचायतने ठराव घेऊन खरेदीची नोंद केली. त्यावेळी राजेश खोणे हे ग्रा.पं. सदस्य होते. जि.प. सदस्य राजेश खोणे व त्यांच्या सहकार्यांनी मृत पित्याच्या जागेवर दुसर्या व्यक्तीला उभे करून आणि बनावट कागदपत्रे तयार करून शासनाची फसवणूक केल्याचे म्हटले आहे. जि.प. सदस्य खोणे व त्यांच्या सहकार्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही राहुल पाटील यांनी केली.
बनावट कागदपत्रांच्या आधारे भूखंड लाटून केली फसवणूक
By admin | Published: December 09, 2014 12:30 AM