- संजय खांडेकरअकोला: मोठ्या आणि नामांकित कंपनीच्या नावाखाली सामान्य ग्राहकांना लुटणारी टोळी ‘व्हॉट्स अॅप’वर सक्रिय असून, यातून अनेकांची फसवणूक होत आहे. केवळ मोबाइल डेटा मिळविणे आणि युजरची संख्या वाढविण्यासाठी असे प्रयोग होत असल्याचे समोर येत आहे.ई-कॉमर्समध्ये सर्वांत मोठी आणि नामांकित असलेल्या कंपनीच्या नावे गत काही दिवसांपासून व्हॉट्स अॅपवर एक मॅसेज सातत्याने फॉरवर्ड केल्या जात आहे. अमूक एक वस्तू केवळ १० टक्के विशेष डिस्काउंटमध्ये उपलब्ध आहे. तातडीने आॅर्डर करा म्हणून मॅसेज एकाकडून १० व्यक्तींकडे आणि १० व्यक्तींकडून हजारो व्यक्तींकडे पाठविले जात आहेत. नामांकित कंपनीच्या नावे मेगा डिस्काउंट असल्याने अनेकजण या फसव्या मॅसेजला बळी पडत आहेत. कधी नामांकित मोठ्या कंपनीच्या नावे तर कधी जागतिक नामांकित स्पोर्ट्स कंपनीच्या नावाखाली असे मॅसेज व्हॉट्स अॅपवर येऊन धडकतात. गत काही महिन्यांपासून अशा फसव्या नेटवर्क जोडणीचे मॅसेज व्हॉट्स अॅपवर जाणीवपूर्वक पसरविले जात असून, यावर कुणाचाही अंकुश नाही. पोलीस गुन्हे शाखेच्या सायबर सेलने त्यावर लक्ष ठेवून या जाळेचा शोध घेऊन यातील प्रमुख टोळी हुडकून काढावी, अशी मागणी अकोल्यातील व्यक्तींकडून होत आहे.असे टाकले जाते जाळे!नामांकित कंपन्यांच्या वस्तूंवर ३० ते ९० टक्के सूट असल्याचे भासवून आधी व्हॉट्स अॅपवर मॅसेज टाकला जातो. या वस्तू खरेदीची नोंद करण्यासाठी तातडीने आॅर्डर करण्याचे सूचविले जाते. आॅर्डर करताच एक नवा मॅसेज लगेच समोर येतो. १० मित्रांच्या व्हॉट्स अॅपवर हा मॅसेज फॉरवर्ड करा, सोबतच १० व्हॉट्स अॅप ग्रुपवर मॅसेज फॉरवर्ड करण्याचे सुचविले जाते. हा मॅसेज करेपर्यंत एका व्यक्तीने किमान शंभर लोकांना हा मॅसेज पाठविलेला असतो. अवघ्या काही मिनिटांत झालेल्या या प्रकारानंतर आॅर्डर स्वीकारल्या जात नसल्याचे कळते. तोपर्यंत मॅसेज फॉरवर्ड करणाऱ्यांची संख्यादेखील हजारोंच्या घरात पोहोचलेली असते. वस्तूंची बुकिंग तर होत नाही, उलटपक्षी पोपट झाल्याचे सर्वांच्या लक्षात येते.युजरची संख्या दाखविण्याचा प्रयोगआॅनलाइन यंत्रणेवर युजरच्या संख्येला फार महत्त्व असते. कोट्यवधींची उलाढाल केवळ युजर सिद्धतेवरून होते. यातील आर्थिक उलाढालीवर लक्ष केंद्रित करून गुन्हेगार प्रवृत्तीची टोळी अशा प्रकारचे फसवे प्रयोग करीत आहे. आमिषाला बळी पडून काही तासांत एखाद्या साइटचे युजर हजारोंच्या संख्येत फुगविले जातात.