चोहोट्टा बाजार/ दहीहांडा : बचत गट तयार करून त्यावर कर्ज काढून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची फसवणूक केल्याची तक्रार दहीहंडा पोलिसांत शुक्रवारी दाखल करण्यात आली आहे. फिर्यादी निर्मला देवीदास आढे या महिलेच्या तक्रारीवरून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.आरोपी नीलेश खर्चे हा पळसोद येथील निर्मला आढे यांच्या घरी आला होता. तुम्ही महिलांचे बचत गट तयार करा मी तुम्हाला ५० हजार रुपयांचे कर्ज काढून देतो, अशी माहिती त्याने दिली. त्यावरून निर्मला आढे यांनी १० महिलांचा गट तयार केला. नीलेश खर्चे याने २० महिलांकडून प्रत्येकी १५०० रुपये व ४० महिलांकडून ३०० रुपये असे पैसे गोळा केले असे एकूण ४२ हजार त्याने जमा केले; परंतु त्यानंतर त्याचा कधीच संपर्क होत नव्हता. शुक्रवारी पळसोद येथील काही नागरिकांना मिळालेल्या माहितीवरून नीलेश खर्चे त्याचे काही सहकारी शेगावला असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून नागरिकांनी तत्काळ शेगाव गाठून नीलेश खर्चे व त्याच्या दोन सहकाऱ्यांना ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. वृत्त लिहेपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. पुढील तपास ठाणेदार कात्रे करीत आहेत. (वार्ताहर)
बचत गटाचे कर्ज काढून देण्याच्या नावावर फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 12:58 PM