अकोला : रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खरप परिसरातील चार प्लॉटची आधीच खरेदी-विक्रीचा व्यवहार झालेला असतानाही बनावट कुलमुखत्यारपत्राद्वारे पुन्हा खरेदी-विक्रीचा व्यवहार करणाऱ्या दोन जणांविरुद्ध रामदासपेठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर या प्रकरणातील एका आरोपीस रामदासपेठ पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावरून बुधवारी रात्री अटक केली.
शास्त्री नगर येथील रहिवासी पुष्पेंद्रकुमार केसरीलालजी शर्मा व त्यांचे व्यावसायिक भागीदार दिलीपकुमार देवचंद चौधरी या दोघांनी खरप बुद्रूूक येथे एक हेक्टर एक आर जमीन खरेदी केली होती. त्यानंतर या शेतीवर प्लॉटची मंजुरी घेऊन ते प्लॉट विक्रीसाठी काढले. या प्लॉटच्या खरेदी-विक्रीचा कुलमुखत्यारपत्र त्यांनी प्रा़ राजा मोतीरामजी शंभरकर वय ५७ वर्ष राहणार यजुर्वेद हाइट्स बिर्ला कॉलनी व विलास मूलचंद पाटील वय ५५ वर्ष राहणार रामनगर या दोघांना लिहून दिले. त्यानुसार या दोघांच्या स्वाक्षरीने या लेआउट मधील २६ ते २७ प्लॉटची खरेदी व विक्री रीतसर करण्यात आली. त्यानंतर काही दिवसांनी या दोघांना दिलेले कुलमुखत्यारपत्र रद्द करण्यात आले; मात्र असे असतानाही प्रा़ राजा शंभरकर, विलास मूलचंद पाटील या दाेघांनी या लेआउट मधील प्लॉट क्रमांक १०, ११, २८ व ६ क्रमांकाचा प्लॉट आधीच खरेदी-विक्री केलेला असतानाही शासकीय अधिकाऱ्यांची फसवणूक करून पुन्हा स्वतःच्या नावाने खरेदी-विक्री केला. या व्यवहारात दिलीप चौधरी, पुष्पेंद्र शर्मा व शासनाची लाख रुपयांनी फसवणूक केली. त्यामुळे या प्रकरणाची तक्रार पुष्पेंद्र शर्मा यांनी रामदासपेठ पोलीस ठाण्यात करताच पोलिसांनी राजा मोतीराम शंभरकर व विलास मूलचंद पाटील या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. तर बुधवारी रात्री यामधील राजा शंभरकर या आरोपीस अटक करण्यात आली असून गुरुवारी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.