अकोला - बँकेमधून बोलत असल्याचे सांगून एटीएम कार्डवरील १६ अंकी क्रमांक व पिन कोड मागून एका पोलीस कर्मचार्याचीच सुमारे ३१ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना बुधवारी घडली. या प्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी मोबाइलवर कॉल करणार्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. जळगाव खान्देश जिल्हय़ातील चोपडा तालुक्यातील कमल या गावातील रहिवासी राजेंद्र प्रताप दोडे (३0) हे पोलीस कर्मचारी म्हणून पोलीस मुख्यालयात कार्यरत आहेत. त्यांच्या मोबाइलवर १२ मार्चपासून कॉल येत असून, दोडे यांना त्यांचे स्टेट बँकेचे खाते बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे सांगून त्यासाठी एटीएम कार्डवर असलेला १६ अंकी क्रमांक व पिन कोड मागण्यात आला. स्टेट बँकेचा कर्मचारी असल्याचे सांगितल्यानंतर राजेंद्र दोडे यांनी आपल्या एटीएमवरील १६ अंकी क्रमांक आणि पिन कोड सांगितला. त्यानंतर अज्ञात मोबाइलधारकाने दोडे यांच्या खात्यातील ३१ हजार ६४0 रुपये काढून घेतले. त्यानंतर काही वेळातच आपली फसवणूक झाल्याचे दोडे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची तक्रार सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये केली. यावरून गुन्हा दाखल केला.
पोलीस कर्मचा-याची फसवणूक
By admin | Published: March 19, 2015 1:30 AM