- नीलिमा शिंगणे-जगडअकोला: शहरात झाडांना खिळे ठोकून किंवा विद्युत खांबावर फुकटात जाहिरातबाजी करणाऱ्यांनी आता आपली पावले खेळाच्या मैदानाकडे वळविले आहे. फुकट्या व्यावसायिकांनी मैदानावरदेखील अतिक्रमण करणे सुरू केले आहे. जिल्हा क्रीडा संकुल समिती अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या संगीतकार वसंत देसाई क्रीडांगणावरील बाहेरील भिंतींवर, आतील भागात अशा फुकट्या व्यावसायिक प्रतिष्ठानांनी सर्रास जाहिरातबाजी करणे सुरू केले आहे. विशेष म्हणजे, याबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अनभिज्ञ आहे, हे येथे उल्लेखनीय.एकीकडे लालबहादूर शास्त्री क्रीडांगणामधील व्यापारी संकुलातील व्यापारांकडून अत्याधिक कर वसूल करणाºया क्रीडा प्रशासनाचे मात्र अशा फुकट्या व्यावसायिकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. याबाबत क्रीडा प्रशासन खरेच अनभिज्ञ आहे की अनभिज्ञ असल्याचे ढोंग करीत आहे. शहरात एकमेव असलेल्या वसंत देसाई क्रीडांगणातील जलतरण तलावाच्या प्रवेशद्वार व आजूबाजूला, बहूद्देशीय हॉल, बास्केटबॉल मैदानाजवळ महिला, पुरुष व बालकांसाठी स्वीमिंग कॉश्चुम व स्पोर्ट वेअर्सच्या एका फुकट्या बुटीक प्रतिष्ठानची जाहिरात जागोजागी लावल्या गेली आहे. जाहिरातीवर पत्ता आणि मोबाइल क्रमांकदेखील आहे. विनापरवाना जाहिरातीवर क्रीडा प्रशासन काही ठोस कारवाई करणार आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.क्रीडा साहित्य, शिकवणी वर्ग, शीतपेयाच्या तसेच उन्हाळी प्रशिक्षण शिबिराच्या जाहिराती फुकटात करण्यासाठी फुकट्या व्यावसायिकांना क्रीडांगण ही जागा सहज उपलब्ध झालेली आहे. फुकट्या व्यावसायिकांनी कुठलाही विचार न करता बिनधास्त जिथे जागा दिसेल तिथे बॅनर लावून जाहिरातबाजी करणे सुरू केले आहे. जिल्हा क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी आहेत. फुकट्या व्यावसायिक प्रतिष्ठानांवर जिल्हाधिकारी काय ठोस कारवाई करतील, की निवडणूक आचारसंहितेचा बागुलवुवा करू न अशा फुकट्या व्यावसायिकांकडे दुर्लक्ष करणार आहेत, याकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागून आहे.कायदेशीर कारवाई होणार!जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांच्याशी यासंदर्भात संपर्क साधला असता, क्रीडांगणात व्यावसायिक जाहिरातींचे बॅनर लावलेले आहेत, याबाबत माहिती नसल्याचे म्हणाले. या व्यावसायिकांनी कुठल्याही प्रकारची अधिकृत परवानगी घेतली नाही. जाहिरात करण्यासाठी रीतसर परवानगी घ्यायला पाहिजे. संकुल समितीला मोबदला दिला गेला पाहिजे. अशा फुकट्या व्यावसायिकाचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.