अकाेला : काेराेना या भीषण संसर्गजन्य विषाणूचा आजार मार्च २०२० मध्ये भारतात आल्यानंतर एप्रिल महिन्यापासून शाळा बंद करण्यात आल्या हाेत्या. त्यामुळे तीन ते चार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर यावर पर्याय म्हणून शाळांनी विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लास सुरू केले. मात्र अनेकांना माेबाईलचे पूर्ण ज्ञान नसल्याने नकाे ते मेसेजही व्हायरल झाल्याचे प्रकार अकाेला जिल्ह्यात घडले आहेत. यासंदर्भात शाळांनी व पालकांनी तक्रारीही केल्या. मात्र याची चाैकशी केली असता, केवळ अज्ञानामुळेच अशा प्रकारचे मेसेज ग्रुपवर व्हायरल झाल्याची माहिती समाेर आली. शाळांनी विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लास सुरू केल्यानंतर अनेक पालकांनीही माेबाईलचे पूर्ण ज्ञान नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लास सुरू करून देण्यासाठी त्यांच्या पालकांकडूनच माेबाईलची हाताळणी करण्यात आली. मात्र गावखेड्यातील अनेक पालकांना या माेबाईलचेही पूर्ण ज्ञान नसल्याने, नकाे ते मेसेज शाळांच्या ग्रुपवर व्हायरल झाल्याचे वास्तव आहे. यासाठी विद्यार्थ्यांना किंवा पालकांनाही दाेषी धरण्यात आले नाही. अकाेला जिल्ह्यातील दाेन शाळांमध्ये असे प्रकार घडले असून सामंजस्याने यावर ताेडगा काढून प्रकरण मिटवण्यात आले.
शाळांनी ही घ्यावी काळजी...
शाळांनी त्यांच्या वर्गनिहाय अभ्यासक्रमाची लिंक ग्रुपवर शेअर ग्रुपच्या बाहेरील किंवा विद्यार्थ्यांचे पालक साेडून इतर कुणीही जाॅइन हाेणार नाही, याची खबरदारी घ्यावी. ती लिंक ऑनलाईन क्लास सुरू हाेण्याच्या पूर्वीच ग्रुपवर सेंड करावी व पालकांनाही सूचना देऊन ही लिंक इतर ग्रुपवर किंवा इतरांना शेअर करू नये, अशा सूचना द्यावात़. त्यामुळे नकाे असलेले व्यक्ती व मेसेज येणार नाहीत.
पालकांनीही दक्ष राहण्याची गरज
बऱ्याचवेळा पालक त्यांच्या कामात असताना मुलांना ऑनलाईन क्लास जाॅइन करून देतात आणि नंतर पालक त्यांची कामे करतात. अशावेळी मुले माेबाईलमधील क्लास साेडून गेम खेळणे, तसेच कार्टुन पाहत असल्याचेही वास्तव आहे. त्यामुळेच अशा मुलांनी इतर लिंक शाळेच्या ग्रुपवर शेअर केल्या आहेत. त्यामुळे पालकांनीही दक्ष राहून मुलांचा ऑनलाईन क्लास हाेईपर्यंत त्यांना साेबतच ठेवावे.
असेही घडू शकते...
जिल्ह्यातील एका तालुक्यातील शाळेत अशिक्षितपणामुळे एका विद्यार्थ्यांने व त्याच्या पालकाने नकाे असलेली लिंक शेअर केली हाेती. हा प्रकार मुद्दाम केल्याचे अनेक पालकांचे म्हणणे हाेते. त्यामुळे शाळा प्रशासनाने व पाेलिसांनी सखाेल चाैकशी केली असता, हा प्रकार केवळ अशिक्षितपणामुळे घडल्याचे समाेर आले.
विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लास घेताना पालकांनी व शाळांनी याेग्य ती खबरदारी घ्यावी. शाळांनी याेग्य ती लिंक शेअर करावी, तर पालकांनीही सर्व कामे साेडून मुलांचे ऑनलाईन क्लास हाेईपर्यंत त्यांना जवळ घेऊन बसावे. जेणेकरून काहीही चुकीचा प्रकार घडणार नाही़
- सचिन कदम
शहर पाेलीस उपअधीक्षक, अकाेला