अकोला: ग्रामीण भागात आजही शारीरिक त्रास असह्य झाल्याशिवाय नागरिक रुग्णालयाच्या पायऱ्या चढत नाहीत. तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो. हे टाळता येऊ शकते. संभाव्य आजारांपासून स्वत:ला वाचवण्यासाठी पंतप्रधान आरोग्य आयुष्यमान योजनेंतर्गत १६ व १७ फेबु्रवारी रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत सर्वोपचार रुग्णालय परिसरात शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या माध्यमातून रुग्णांना किरकोळ असो वा गंभीर स्वरूपाच्या आजारावर सर्व प्रकारचे उपचार मोफत केल्या जाणार असल्याने जिल्हावासीयांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन खासदार अॅड. संजय धोत्रे यांनी गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत केले.आज रोजी वयस्कर किंवा तरुण वयातील महिला-पुरुषांना क र्करोग, हृदय विकार, किडनीचे आजार, मेंदू विकाराने ग्रासल्याचे चित्र सर्रास पहायला मिळते. ही निश्चितच धोक्याची घंटा आहे. २० ते २५ वर्षांपूर्वी खासगी रुग्णालयांची संख्या नगण्य असल्याने सर्वच स्तरातील नागरिक जिल्हा रुग्णालयात जाऊन उपचार करत होते. सद्यस्थितीत शहरात तज्ज्ञ डॉक्टर, खासगी रुग्णालयांची संख्या वाढली असली तरी त्यातुलनेत रुग्णांची संख्यादेखील कितीतरी पट अधिक झाल्याचे चित्र आहे. अनेकदा सर्वसामान्य नागरिकांना खासगी रुग्णालयातील महागडे उपचार परवडत नाहीत, त्यामुळे रुग्णांची परवड होते. या सर्व बाबी लक्षात घेता पंतप्रधान आरोग्य आयुष्यमान योजनेंतर्गत राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदार संघात मोफत आरोग्य शिबिराच्या माध्यमातून रुग्णांची तपासणी व सर्व प्रकारच्या आजारांवर मोफत उपचार केले जाणार असल्याची माहिती खा.अॅड.संजय धोत्रे यांनी दिली. गंभीर स्वरूपाच्या आजारावर उपचार करण्यासाठी पाच लाख रुपयांपर्यंतचा खर्च शासनाकडून केला जाणार असून, या शिबिराचा जिल्ह्यातील समस्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन खा.धोत्रे यांनी केले. पत्रकार परिषदेला ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा, आ.प्रकाश भारसाकळे, आ.रणधीर सावरकर, महापौर विजय अग्रवाल, जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात पाटील, महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील, उपमहापौर वैशाली शेळके, मनपा स्थायी समिती सभापती विशाल इंगळे, सभागृहनेत्या गितांजली शेगोकार, नगरसेवक डॉ.विनोद बोर्डे, शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विजय जाधव, डॉ.राजकुमार चव्हाण, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.आरती कुलवाल आदी उपस्थित होते.तज्ज्ञ डॉक्टर करतील आजाराचे निदान!राज्याच्या कानाकोपºयातून तज्ज्ञ डॉक्टरांची चमू अकोल्यात दाखल होत आहे. तज्ज्ञ डॉक्टर रुग्णांच्या तपासण्या करतील. त्यानंतर पुढील उपचारासाठी रुग्णांना मुंबई, नागपूर किंवा कोणत्याही शहरात उपचार घेण्याची गरज पडल्यास प्रवासासह सर्व खर्च शासन स्तरावरून केला जाणार असल्याचे खा. अॅड. संजय धोत्रे यांनी सांगितले.डॉक्टर, सेवाभावी संस्था सरसावल्या!आरोग्य शिबिरात विविध प्रकारच्या महागड्या सुविधा, साहित्य मोफत उपलब्ध करून देण्यासाठी डॉक्टर, सेवाभावी संस्था सरसावल्या आहेत. यामध्ये स्थानिक डॉक्टरांसह मुंबई, हैदराबाद, औरंगाबाद, नागपूर, बुलडाणा, जळगाव, वर्धा व अमरावती येथील तज्ज्ञ डॉक्टर १६ व १७ फेब्रुवारी रोजी सेवा देतील. जिल्ह्यातील आशा वर्कर, प्राथमिक आरोग्य केंद्र, महापालिकेसह नगरपालिकेची यंत्रणा कार्यान्वित राहील.शेगाव संस्थानकडून जेवणाची व्यवस्था!आरोग्य शिबिरासाठी जिल्ह्यातून आठ हजारांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली असून, यापैकी अडीच हजार जणांना गंभीर स्वरूपाचा आजार असल्याचे समोर आले आहे. रुग्ण, त्यांचे नातेवाईक व शिबिरात सेवा देणाºयांसाठी संत गजानन महाराज संस्थान, शेगावच्यावतीने जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.राजकीय आरोग्यात आपोआप सुधारणा होईल!भाजपच्या अंतर्गत राजकीय आरोग्यात कधी सुधारणा होईल, अशी विचारणा खा. संजय धोत्रे यांना केली असता शरीरावरील जखमेत अनेकदा ‘पू’ निर्माण होतो. त्या जखमेला चिरा न देता संबंधित डॉक्टर काहीकाळ प्रतीक्षा करण्याची सूचना करतात. त्यानंतर त्या जखमेतून आपोआप ‘पू’ निघाल्याने शरीराला चिरा देण्याची गरज भासत नाही. तशाच पद्धतीने पक्षाच्या राजकीय आरोग्यातही आपोआप सुधारणा होणार असल्याचा टोला त्यांनी लगावला.