अकोला: राज्य शासनामार्फत राज्यातील १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यात अकोला जिल्ह्यातील पाच तालुक्यांचा समावेश आहे. शासनाच्या निर्णयानुसार राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दुष्काळसदृश तालुक्यांमधील विद्यार्थ्यांना १५ नोव्हेंबर २0१८ ते १५ एप्रिल २0१९ या कालावधीत एसटीची मोफत प्रवास सुविधा ५ नोव्हेंबर रोजी जाहीर केली आहे.एसटी महामंडळातर्फे सद्यस्थितीत शैक्षणिक, तांत्रिक व व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मासिक पासमध्ये ६६.६७ टक्के सवलत दिली जाते. विद्यार्थ्यांकडून केवळ ३३.३३ टक्केच रक्कम वसूल केली जाते; परंतु यंदा शासनाने राज्यातील १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती असल्याचे जाहीर केले आणि दुष्काळसदृश तालुक्यांमधील जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जांचे पुनर्गठन, शेतीशी संबंधित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपांच्या चालू वीज बिलात ३३.५ टक्के सूट, विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी यासह इतर सवलती दिल्या आहेत. यांतर्गतच राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दुष्काळसदृश तालुक्यांमधील विद्यार्थ्यांना एसटीमध्ये मोफत प्रवास सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जिल्ह्यातील अकोला तालुक्यासह बाळापूर, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर, तेल्हारा या पाच तालुक्यांमधील विद्यार्थ्यांना मोफत प्रवास सुविधेचा १५ नोव्हेंबरपासून लाभ घेता येणार आहे. या निर्णयानुसार शिक्षण घेणाºया उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून ३३.३३ टक्के रक्कम २0१८-१९ च्या उर्वरित शिक्षण सत्रासाठी वसूल करू नये, असेही राज्य परिवहन महामंडळाने स्पष्ट केले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी १५ नोव्हेंबर २0१७ ते १५ एप्रिल २0१९ हा कालावधी राहील. ही सवलत दुष्काळसदृश तालुक्यांसाठी आहे. या तालुक्यांमधील विद्यार्थ्यांकडून उर्वरित रक्कम वसूल करू नये, सवलत केवळ पास नूतनीकरण करणाºया विद्यार्थ्यांसाठी अनुज्ञेय राहील. नव्याने पास घेणाºयांसाठी ही सवलत लागू नाही. ही सवलत शहरी सेवेसाठी नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या सवलतीबाबत आगार व विभागीय पातळीवर निर्देश देण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)