अनिल गवई / खामगाव गत तीन वर्षांपासून परिसरात अत्यल्प पावसामुळे दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर मेटाकुटीस आला आहे. आर्थिक विपन्नतेचा परिणाम मुलांच्या शिक्षणावरही होत आहे. त्यामुळे दारिद्रय़ आणि दुष्काळाने होरपळलेल्या गरीब शेतकरी-शेतमजुरांच्या मुलांसाठी खामगाव येथील नऊ शिक्षकांच्या चमूने मोफत शिकवणी वर्ग सुरू केला आहे. या शिकवणी वर्गात दहावी- बारावीच्या ९२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, अनेक निराधारांनाही या शिकवणी वर्गाचा लाभ मिळणार आहे. खामगाव शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत शिकवणी उपलब्ध व्हावी, यासाठी सामाजिक कार्यकर्ते ईश्वरसिंह ठाकूर यांची धडपड होती. त्यांच्या धडपडीला सुधीर सुर्वे या धडाडीच्या शिक्षकाची साथ मिळाली. त्यानंतर शाळा-महाविद्यालय सुरू झाल्यानंतर ह्यमोफत शिकवणीह्ण वर्गाच्या मूळ संकल्पनेला मूर्त रूप देण्यात आले. शहरातील दलित वस्ती आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक राहत असलेल्या वस्तींमध्ये विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. ह्यमोफत शिकवणीह्ण वर्गाची संकल्पना विद्यार्थी आणि पालकांना समजावून सांगण्यात आली. दरम्यान, विद्यार्थी आणि पालकांचे या शिकवणी वर्गाचे प्रबोधन सुरू असतानाच, काही सामाजिक कार्यकर्त्यांची आणि शिक्षकांची साथ मिळाल्याने, मोफत शिकवणी वर्गासाठी नऊ शिक्षकांची एक चमू तयार झाली. या चमूने विद्यार्थ्यांंची निवड करीत, त्यांना आता मोफत शिकविण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांच्या समोरील आर्थिक पेच सुटण्यास मदत झाली आहे. गत तीन वर्षांपासून सातत्याने दुष्काळ असल्याने शेतकर्यांची आर्थिक परिस्थिती अधिकच खालावली आहे. या निर्णयामुळे त्यांना बराच दिलासा मिळणार आहे.
दुष्काळी परिस्थितीतील शेतक-यांच्या मुलांना मोफत शिकवणी!
By admin | Published: July 07, 2016 2:37 AM