लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : खारपाणपट्ट्यातील ६४ गावांची तहान भागविणाऱ्या खांबोरा बंधाऱ्यात काटेपूर्णा प्रकल्पाचे पाणी आणण्यासाठी जलवाहिनी टाकण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रालयाने १९ कोटी ९१ लाख रुपयांच्या कामास प्रशासकीय मान्यता दिल्याने, लवकरच हे काम सुरू होणार आहे.खारपाणपट्ट्यातील ६४ गावे खांबोरा ग्रामीण पाणीपुरवठा योजनेखालील जनतेची पाणीटंचाईमधून मुक्तता करण्यासाठी जिल्ह्याचे खासदार संजय धोत्रे यांचे मार्गदर्शन व आ. गोवर्धन शर्मा यांच्या सहकार्याने आ. रणधीर सावरकर यांनी काटेपूर्णा प्रकल्प ते खांबोरा बंधाऱ्यापर्यंत पाइपलाइनद्वारे पाणी आणण्याच्या सुमारे २४ कोटी रुपयांच्या प्रस्तावास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मान्यता मिळविण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले होते.या प्रयत्नाचा दुसरा आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजे या प्रस्तावास पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून १९ कोटी ९१ लाख रुपयांच्या कामास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. ही योजना कार्यान्वित झाल्यानंतर खारपाणपट्ट्यातील पाण्याचा प्रश्न व टंचाईच्या दुष्ट चक्रातून ग्रामस्थांची कायम सुटका होईल. त्यामुळे परिसरातील लोकांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खा. संजय धोत्रे, आ. गोवर्धन शर्मा व आ. रणधीर सावरकर यांचे आभार मानले आहेत.जलहानी टळणार, विजेचीही बचत होणार!खांबोरा योजनेसाठी नदीद्वारे पाणी सोडण्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची हानी होत होती. आता जलवाहिनीच्या कामास हिरवी झेंडी मिळाल्याने जलहानी टळणार आहे. हे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारे करण्यात येणार असून, काम पूर्ण झाल्यानंतर जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागास देखभाल दुरुस्तीकरिता हस्तांतरित करण्यात येणार आहे. सदर प्रस्तावित काम, पाणी गुरुत्व वाहिनीद्वारे अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून पूर्ण करण्यात येत आहे. त्यामुळे विजेचा वापर करण्याची गरज नसल्याने वीज खर्चाची बचत होणार आहे.
‘६४ खेडी’साठी जलवाहिनीचा मार्ग मोकळा
By admin | Published: May 18, 2017 1:07 AM