शनिवारी महासभेत होणार सदस्यांची निवड
अकोला : विभागीय आयुक्त कार्यालयातील प्रक्रिया पूर्ण झाल्याने महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या गठनाचा मार्ग मोकळा झाला आहे. स्थायी समितीच्या सोळा सदस्यांची निवड १५ एप्रिल रोजी होणाऱ्या महासभेत होणार असून, त्यानंतर समितीचे गठन करण्यात येणार आहे. फेब्रुवारी महिन्यात पार पडलेल्या महापालिकेच्या निवडणुकीत सर्वाधिक ४८ नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे निवडून आले आहेत. त्यानंतर शिवसेनेचे ८, काँग्रेसचे १३, राकाँचे ५, भारिप-बमसंचे ३, एमआयएम १ व अपक्ष २ असे एकूण ८० नगरसेवक निवडून आले आहेत. स्थायी समितीवर पहिल्या वर्षभरासाठी निवडून जाण्यासाठी १६ सदस्यांची निवड केली जाणार आहे. या १६ पैकी १० सदस्य भाजपचे राहणार आहेत. आता राकाँ, भारिप-बमसं, एमआयएम या पक्षांनी एकत्र येत लोकशाही आघाडीची स्थापना केली आहे. त्यामुळे काँग्रेसचा एक सदस्य कमी होणार असून, लोकशाही आघाडीच्या आणखी एका सदस्याची वर्णी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. काँग्रेसचा एक सदस्य, तर शिवसेनेचे दोन सदस्य स्थायी समितीमध्ये जाण्याची शक्यता आहे. राकाँ व भारिप-बमसंच्या प्रत्येकी एका सदस्याची निवड करण्यात येणार आहे. यापैकी दोन सदस्यांची निवड ईश्वरचिठ्ठीने होणार आहे.सभापती पदासाठी यांच्या नावाची चर्चास्थायी समितीच्या सभापती पदासाठी नगरसेविका गीतांजली शेगोकार, संजय बडोणे, बाळ टाले व रश्मी प्रशांत अवचार यांच्या नावांची चर्चा आहे.