दिग्रस बु. : सस्ती येथील वीज उपकेंद्रांतर्गत येत असलेल्या अनेक गावांत वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याचा प्रकार घडत आहेत. वीज पुरवठा खंडित होत असल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिसरातील गावांत गुरुवार व शुक्रवारी दिवसभर वीज पुरवठा वारंवार खंडित होत होता. दुसरीकडे, वीज बिल वाढून येत असल्याने ग्रामस्थ आर्थिक संकटात सापडले आहेत.
सस्ती येथील वीज उपकेंद्रांतर्गत परिसरातील गावांत मागील कित्येक महिन्यापासून वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. खंडित वीज पुरवठ्यामुळे ग्रामस्थांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहेत. गावात अंधाराचे साम्राज्य पसरले असून, डासांच्या प्रादुर्भावामुळे नागरिक हैराण झाले आहेत. ऐन पावसाळ्यात वीज पुरवठा खंडित होत असल्याने रात्रीच्या दरम्यान सरपटणारे प्राण्यांची (साप, विंचू आदी) भीती वाढली आहे. गावात वीज कर्मचारी कायमस्वरूपी देण्यात यावा किंवा तांत्रिक कर्मचारी देण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. याकडे वरिष्ठ अधिकारी लोकप्रतिनिधी आदींनी लक्ष देऊन समस्या दूर करावी, अशी मागणी युवकांनी केली आहे.
---------------------
वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत. सस्ती येथील वीज उपकेंद्र सुरळीत सेवा देण्यास अपयशी ठरत आहे. या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाने लक्ष देऊन समस्या दूर करावी.
- प्रसेनजीत रोकडे, तुलंगा.
-----------
दिग्रस बु. गावात मागील चार महिन्यांपासून विद्युत कर्मचारी नसल्याने ग्राहकांना वीज समस्यांबाबत अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. वरिष्ठांनी लक्ष देऊन समस्या दूर करावी.
- मनोज गवई, माजी उपसरपंच, दिग्रस बु.