निहिदा: सणासुदीच्या काळात पिंजर येथील उपकेंद्रांतर्गत येत असलेल्या गावांमध्ये वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने ग्रामस्थ वैतागले आहेत. याकडे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
पिंजर येथील उपकेंद्रांतर्गत गत दहा महिन्यांपासून कनिष्ठ अभियंता नसल्याने समस्या वाढल्या आहेत. दि. २ सप्टेंबर रोजी कनिष्ठ अभियंत्याची निवड झाल्याची माहिती आहे; मात्र अद्यापही ते रुजू झाले नाहीत. त्यामुळे येथील कारभार वाऱ्यावर आहे. पिंजर परिसरात दररोज तासन्तास वीजपुरवठा खंडित असतो. तसेच या उपकेंद्रांतर्गत एखाद्या गावात नेहमीच तांत्रिक बिघाडाची समस्या उद्भवते. मात्र, येथील महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. येणारा काळ हा सणासुदीचा काळ असल्याने गावात वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे. वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.
--------------------
पिंजर येथे गेल्या दहा महिन्यांपासून कनिष्ठ अभियंता नसल्याने गावात समस्या वाढल्या आहेत. सणासुदीच्या काळात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक वैतागले आहेत. तसेच याबाबत कर्मचाऱ्यांना माहिती दिली असता, कर्मचारी भ्रमणध्वनी उचलत नाहीत. वरिष्ठांनी लक्ष देऊन वीजपुरवठा सुरळीत करावा.
-गुलाबराव सुखदेवराव लोनाग्रे, ग्रामस्थ, रा. पिंजर.
------------------
पिंजर येथे कनिष्ठ अभियंता दिले आहेत. ते एक-दोन दिवसांत रुजू होणार आहेत. नागरिकांच्या समस्या मार्गी लागणार आहेत.
-बोळे, उपअभियंता, वीज कंपनी, पिंजर.