डाॅक्टर होण्यापूर्वीच रणजीत धबाले याला दुर्धर आजार असलेल्या पॅराप्लेजियाने ग्रासले. २४ वर्षांचा तरुण या आजाराने निर्बल त्याला पुन्हा स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी त्यांचे सहकारी डाॅक्टर मित्र पुढे सरसावत ७ लाख ३४ हजार रुपये गोळा केले. दानशूर समाजाने त्याला मदत करावी, असे आवाहन डाॅक्टरमित्रांनी केले आहे.
मूळचे बाळापूर येथील रहिवासी असलेले शेतकरी कुटुंबातील देविदास पुंडलिक धबाले पुणे येथे एका खासगी कंपनीत नोकरी करतात. त्यांचा रणजीत हा मुलगा अगदी सुरुवातीपासूनच अत्यंत हुशार. त्याने गुणवत्तेच्या जोरावर मिरज, जि.सांगली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २०१५च्या बॅचमध्ये दाखल झाला, त्याचे वैद्यकीय शिक्षण सुरू असतानाच, २०१८ मध्ये त्याच्या पाठीत आणि पायात वेदना जाणवू लागल्या. तपासणीअंती मणक्यात गाठ सापडली. शस्त्रक्रिया अत्यंत जोखमीच्या व आवश्यक होत्या, परंतु कुटुंबाने धीर सोडला नाही.
वडिलांनी आयुष्यभराची पुंजी पणाला लावली. लागोपाठ दोन शस्त्रक्रिया झाल्या. १५ लाख रुपये संपले. गाठ निघाली, पण पायांची विकलांगता कायम आहे. दोन्ही पायांत पुरेशा संवेदना नाहीत. अशातच दिल्लीतील आयबीस रुग्णालयात रोबोटिक सायबरडाइन थेरेपीचे यशस्वी उपचार होऊ शकतात, हे समजले, त्यासाठी २३ लाखांवर खर्च अपेक्षित होता. मित्रांनी क्राउड फंडिंग मोहीम सुरू केली. मिलाप संकेतस्थळावर रणजीतचा संघर्ष अपलोड केला. मदतीचे आवाहन केले. खटाटोपाला यश आले. पाहता-पाहता ७ लाख ३४ हजार रुपयांचा निधी उभा राहिला. प्राध्यापक, कर्मचारी, समाजबांधव, नातेवाइकांसह अमेरिका, इंग्लंडमधूनही मदतीचे हात पुढे आले. मिरज आयएमएने पुढाकार घेतला. त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र आयएमए पुढे येत आहे. मिरज वैद्यकीय महाविद्यालयातून बाहेर पडलेल्या शेकडो डाॅक्टरांनी त्याच्या मदतीसाठी पुढाकार घेतला.
फोटो:
आणखी मदतीची गरज
अद्याप १६ लाख रुपये गोळा व्हायचे आहेत. भविष्यात डाॅक्टर होऊन समाजाच्या सेवेत वाहून घेणाऱ्या डाॅ.रणजीतला मदतीची नितांत गरज आहे. उमेदीच्या वयातला तरुण अंथरुणाला खिळून राहणे वेदनादायी आहे. मदतीचे हात पुढे येण्याची गरज आहे.
हालचाली थांबल्या, शिक्षण थांबले नाही!
पॅराप्लेजिया म्हणजे, एक प्रकारे लकवाच. त्याने रणजीतच्या हालचाली थांबल्या, पण शिक्षण मात्र थांबले नाही. त्याचे डॉक्टर मित्र त्याच्यासाठी हातपाय बनले. रणजीतची शुश्रूषा करण्यापासून व्हीलचेअरवर वर्गात नेईपर्यंत मित्रांनी जबाबदारी घेतली. कुशाग्र बुद्धिमत्तेच्या रणजीतने मित्रांचा विश्वास सार्थ ठरविला. एमबीबीएस यशस्वीरीत्या पूर्ण केले. डाॅक्टर झाला, पण इंटर्नशिप बाकी होती. त्यासाठी प्रत्यक्ष रुग्णालयात काम करणे गरजेचे होते, परंतु रणजीतला ते शक्य नव्हते. यावेळीही मित्रच पुढे सरसावले.