अकोला : नगर परिषद कर्मचार्यांच्या मागण्या उद्यापही पूर्ण न झाल्यामुळे जिल्हय़ातील नगर परिषद कर्मचार्यांच्या वतीने १ जुलै रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनानुसार, राज्यातील नगर परिषद कर्मचार्यांनी संघटनेच्या अधिनस्त यापूर्वी शासनाकडे प्रलंबित मागण्या मान्य होण्याकरिता कर्मचार्यांनी अनेकदा आंदोलन केले; मात्र राज्य शासनाने याची कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे संघटनेच्या वतीने १ जुलै रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यानंतरही शासनाने न्याय मागण्यांवर विचार न केल्यास १५ जुलैपासून नगर परिषद कर्मचारी बेमुदत संपावर जातील, असा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये स्वच्छता, पाणीपुरवठा, अग्निशमन यांच्यासह सर्व कर्मचारी सहभागी होणार आहे. यादरम्यान नागरिकांच्या होणार्या गैरसोयीला शासन जबाबदार असणार, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर राज्य कार्यकारिणी सदस्य गजानन इगळे, विदर्भ संघटक सी. आर. उंटवाल, जिल्हाध्यक्ष प्रदीप रावणकर, जिल्हा उपाध्यक्ष दीपक सुरवाडे यांच्या स्वाक्षर्या आहे.
नगर परिषद कर्मचार्यांचा मोर्चा
By admin | Published: July 03, 2014 1:25 AM