अकोला: युवराज ऊर्फ सागर आपोतीकर याच्यावर सशस्त्र हल्ला करून त्याची हत्या करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास देशमुख फैलातील शेकडो महिला, पुरुष व युवकांनी पोलिस अधीक्षक कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी जिल्हाधिकारी अरुण शिंदे, पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांना निवेदन देऊन, विजयनगरातील युवकांच्या गुंडगिरीला आळा घालण्याची मागणी केली. सोमवारी दुपारी शिवाजी महाविद्यालयासमोर युवराज आपोतीकर याच्यावर पूर्व वैमनस्यातून हल्ला केला होता. बुधवारी रात्री १ वाजताच्या सुमारास युवराजचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे देशमुख फैल परिसरात तणाव निर्माण झाला होता. शुक्रवारी देशमुख फैलातील शेकडो नागरिकांनी महापौर उज्ज्वला देशमुख यांच्या नेतृत्वात पोलिस अधीक्षक कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी निवेदन देण्यात आले. निवेदनात विजयनगरातील काही युवक गुंडगिरी करीत असून, परिसरातील युवती, महिलांची छेडखानी करतात. तसेच किरकोळ कारणांवरून वाद घालून परिसरातील नागरिकांना त्रास देतात. दारू पिऊन हैदोस घालतात आणि परिसरामध्ये अवैध दारू, गांजा विक्री करतात. गुंड प्रवृत्तीच्या युवकांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी मागणीही करण्यात आली
हत्येच्या निषेधार्थ मोर्चा
By admin | Published: November 22, 2014 2:04 AM