- प्रवीण खेते
अकोला: जानेवारी महिन्यात कोरोनावर लस मिळण्याची शक्यता असल्याने शासनाकडून ‘कोविड डाटाबेस प्रोग्राम’अंतर्गत फ्रंटलाइन वैद्यकीय कर्मचाऱ्यांची यादी मागितली आहे. ही लस सर्वप्रथम हायरिस्क गटातील व्यक्तींना दिली जाणार असल्याने तशी यादी तयार केली जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील २,३७० वैद्यकीय कर्मचाऱ्यांची माहिती संकलीत करण्यात आली असून, यामध्ये आणखी वाढ होणार आहे.
कोरोना लसीवर अद्याप संशोधन सुरू असले, तरी जानेवारी महिन्यापर्यंत ही लस मिळण्याची शक्यता आहे. ही लस सर्वप्रथम हायरिस्क गटातील फ्रंटलाइन वैद्यकीय कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. त्या अनुषंगाने ‘कोविड डाटाबेस प्रोग्राम’ राबविण्यात येत आहे. या अंतर्गत शासनातर्फे जिल्ह्यातील फ्रंटलाइन वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची माहिती मागविण्यात आली आहे. त्यानुसार आरोग्य विभागातर्फे हायरिस्क असलेल्या फ्रंटलाइन वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यात येत आहे. आतापर्यंत २,३७० जणांची यादी तयार करण्यात आली आहे.
यांना मिळणार लस
हायरिस्क गटातील एएनएम, डॉक्टर, रुग्णवाहिका चालक, आशा, तसेच कोरोना काळात फ्रंटलाइन काम केलेल्या शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे.
खासगी वैद्यकीय कर्मचाऱ्यांचाही समावेश
मुंबई नर्सिंग होम अंतर्गत नोंदणीकृत खासगी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही कोविड डाटाबेस प्रोग्राम अंतर्गत लस दिली जाणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ९७ जणांच्या नावाची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये बाळापूर येथील ९१ ,तर मूर्तिजापूर येथील ६ जणांचा समावेश आहे.
कोविड डाटाबेस प्रोग्राम अंतर्गत फ्रंटलाइन वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. त्या अनुषंगाने वैद्यकीय कर्मचाऱ्यांची माहिती संकलीत करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक,अकोला.