जिल्ह्यात ४ जानेवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. त्यानंतर उमेदवारांची निश्चिती झाल्यानंतर चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाने आता १९० निवडणूक चिन्हे निश्चित केली आहेत. यात सफरचंद, हिरवी मिरची, आले, ढोबळी मिरची, फुलकोबी, मका, अक्रोड, कलिंगड आदी फळे, भाज्यांबरोबरच संगणक, पेन ड्राइव्ह, माऊस, फोन चार्जर, स्वीच बोर्ड आदी इलेक्ट्राॅनिक्स वस्तू आणि त्यांच्या विविध भागांचाही समावेश आहे. या १९० चिन्हांपैकी उमेदवाराला आवडीचे चिन्ह निवडण्याचा पर्याय निवडणूक आयोगाने उपलब्ध करुन दिलेला आहे. प्रत्येक तहसील कार्यालयाच्या दर्शनी भागावर चिन्हांची यादी लावली आहे. त्यामुळे चिन्हांची माहिती होण्यास मदत होत आहे.
अशी आहेत चिन्ह
निवडणूक आयोगाने निवडणुकीसाठी १९० चिन्हांची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये कपाट, सफरचंद, ऑटोरिक्षा, फुगा, बॅट, पुस्तक, बादली, केक, कॅमेरा, कॅरम बोर्ड, कोट, कंगवा, हिरा, कप-बशी, केटली, चावी, लॅपटाॅप, लुडो, कढाई, पेन ड्राइव्ह, कैची, अननस, छत्री, पांगुळगाडा, टोपली, फलंदाज, विजेचा खांब, डिश अँटेना, ऊस, बासुरी, मिक्सर, पंचिंग मशीन, फ्रीज, शिवण यंत्र, स्कुटर, सोफा, बिगुल, तुतारी, टाईप राईटर, अक्राेड, कालिंगड, पाण्याची टाकी, विहीर, सिटी, चिमटा, नांगर
वेगवेगळ्या चिन्हांवर लढावे लागणार
प्रत्येक ग्रामपंचायतीत किमान ३ प्रभाग असतात, मात्र आता प्रत्येक ग्रामपंचायतींच्या प्रभागात एकच पॅनेल असेल तरी प्रत्येक उमेदवाराला वेगवेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे. त्यामुळे आता उमेदवारांची खरी कसरत होणार आहे.
पेन ड्राईव्ह, चार्जर, माऊस, स्वीच बोर्ड, नेलकटर या नवीन चिन्हांची पडली भर
निवडणूक आयोगाने नोव्हेंबर २०१९ मध्ये ग्रामपंचायतींच्या उमेदवारांसाठी १९० निवडणूक चिन्हांचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. पर्याय निवडताना उमेदवारांना आवडीची ५ चिन्हे प्राधान्यक्रमाने दिली जातात.
दैनंदिन जीवनातील फळे, भाज्या, पाव, ब्रेड टोस्टर आदी खाद्य पदार्थांबरोबरच आयोगाने संगणक, माऊस, पेन ड्राईव्ह आदी आधुनिक इलेक्ट्राॅनिक्स वस्तुंचा समावेशही नव्या चिन्हांमध्ये केला आहे.
या चिन्हांमध्ये चिमटा, मोजे, नेलकटर, दातांचा ब्रश, पेस्ट आदी मजेशीर चिन्हांचाही समावेश आहे.
निवडणूक आयोगाने उमेदवारांना त्यांच्या पसंतीप्रमाणे निवडणूक चिन्हे निवडता यावीत यासाठी १९० पर्याय उपलब्ध करुन दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आता होणाऱ्या निवडणुकीत प्रत्येक उमेदवार पसंतीचे चिन्ह निवडू शकेल. या संदर्भात यंत्रणांना तसेच उमेदवारांपर्यंत सर्व माहिती पाेहचविली आहे.
संजय खडसे उपजिल्हाधिकारी , अकोला