बोरगाव वैराळे : बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा पोलीस स्टेशन अंतर्गत जीवघेणा हल्ला करून फरार झालेल्या आरोपीस तब्बल सहा महिन्यांनंतर गुप्त माहितीच्या आधारे उरळ पोलिसांनी अटक करून नांदुरा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या आलमपूर येथील राजू आनंदा चंदनशिव (३८) याने गत सहा महिन्यांपूर्वी एकावर जीवघेणा हल्ला केला होता. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. याबाबत नांदुरा पोलिसांनी राज्यातील सर्व पोलीस स्टेशनला बिनतारी संदेश पाठविण्यासोबत आरोपीचे छायाचित्र पाठवून आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. नांदुरा पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधार घेत फरार असलेला आरोपी राजू आनंदा चदनशिव हा उरळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आगर येथे असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर उरळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार विलास पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस नाईक विजय चव्हाण, शैलेश घुगे यांनी फरार आरोपीस मोठ्या शिफातीने अटक केली. त्यानंतर या अरोपीस नांदुरा पोलिसांच्या ताब्यात दिले.
फरार आरोपीस सहा महिन्यानंतर अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 18:13 IST