- सचिन राऊत
अकोला -खेड्यापाड्यांसह शहरातील तरुणांना ‘फन टार्गेट आॅनलाइन कसिनो’ नावाच्या अत्याधुनिक जुगाराने विळखा घातला आहे. आधीच्या जुगारात प्रत्येक तासाला सोडत निघायची; मात्र आता या आॅनलाइन कसिनोची सोडत दर मिनिटाला निघत आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तरुणांसह अनेक जण या मायाजाळात चांगलेच अडकले आहेत.जिल्ह्यातील बाभूळगाव येथे शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील यांच्या पथकाचे प्रमुख तुषार नेवारे यांनी येथील आॅनलाइन कसिनोवर छापा टाकला. त्यांनी संगणकावरील एका अॅपद्वारे खेळण्यात येत असलेल्या फन टार्गेट गेम आॅनलाइन कसिनोचा पर्दाफाश केल्यानंतर या आॅनलाइन कसिनोने खेड्यापाड्यातील तरुणांना विळखाच घातल्याचे वास्तव समोर आले. संगणकावर एका गोलाकारात १० आकडे देण्यात आलेले आहेत. यामध्ये प्रत्येकाने त्याचा आकडा निवडावा व त्यावर पैसे लावावे, त्यानंतर या गोलाकारात घड्याळ्यात असलेल्या काट्याप्रमाणे काटे एक मिनीट फिरतात, त्यानंतर सदर काटा ज्या आकड्यावर थांबेल त्यांना परतफेड करण्यात येते तर उर्वरितांचे पैसे हा गेम चालविणारा घेतो. अशा प्रकारे दर मिनिटाला या आॅनलाइन कसिनोची सोडत संगणकावर होत असून, १०० रुपयांना एक हजार ते एक हजार ५०० रुपये देण्यात येत असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. या आॅनलाइन कसिनोमुळे जुगाराचे अत्याधुनिक स्वरूप सध्या वाऱ्यासारखे खेड्यात आणि शहरात पसरत असून, अनेकांना या आॅनलाइन गेमने भुरळ घातली आहे.
एकाचवेळी हजारो लोक खेळतातनेटद्वारे कनेक्ट असलेला आॅनलाइन कसिनो एकाचवेळी हजारो लोक खेळतात. १० आकड्यांपैकी एक आकडा निवडावा लागतो. त्यानंतर संगणकाच्या स्क्रीनवर आॅनलाइन खेळ एक मिनीट चालतो. ज्यांचा आकडा निघतो, त्यांना चांगलीच परतफेड मिळते तर उर्वरित लोकांचे पैसे गेमचा संचालक व त्याचा मुख्य सूत्रधार या दोघांना मिळतात. अॅपची विक्री; मात्र पासवर्ड गुलदस्त्यातवाशिममधील जमील नामक व्यक्ती आॅनलाइन कसिनोचा मुख्य सूत्रधार असल्याची माहिती आहे. तो या कसिनोचा अॅप संगणकात फीड करून देतो; मात्र या अॅपचा आयडी आणि पासवर्ड हा त्याच्याकडेच ठेवण्यात येतो. आॅनलाइन कसिनो हा खेळ चालविण्यासाठी खेड्यात व शहरात हिस्सेवाटीने मानसे ठेवण्यात आली आहेत.