अकोला : जिल्ह्यातील खारपाणपट्टय़ात जलशुद्धीकरण केंद्र प्रकल्पासह (आरओ प्लांट) शहरातील सांस्कृतिक भवनासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याची मागणी पालकमंत्री व लोकप्रतिनिधींनी राज्य मंत्रिमंडळातील वित्तमंत्र्यांकडे गुरुवारी केली. त्यामुळे आरओ प्लांटसह सांस्कृतिक भवनासाठी निधी उपलब्ध होणार असल्याचे संकेत प्राप्त झालेत.गत शनिवारी पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेत सन २0१५-१६ या वर्षासाठी जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत कृषी व संलग्न सेवा, ग्रामविकास, सामाजिक व सामूहिक सेवा, पाटबंधारे आणि पूरनियंत्रण, ऊर्जा, उद्योग व खाण, परिवहन, सामान्य आर्थिक सेवा, सामान्य सेवा आणि नावीन्यपूर्ण, बळकटीकरण व मूल्यमापन या क्षेत्रांसाठी ९३ कोटी ६७ लाखांच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी देण्यात आली. जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेसाठी मंजूर आराखड्यात तरतुदीव्यतिरिक्त १४५ कोटी ६२ लाख ४७ हजार रुपयांची अतिरिक्त मागणी करण्यात आली आहे. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांची बैठक गुरुवार, २९ जानेवारी रोजी अमरावती येथील विभागीय आयुक्त कार्यालयात वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली. त्यामध्ये अकोला जिल्हा वार्षिक योजनेच्या बैठकीला पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यासह खासदार संजय धोत्रे, जिल्हा परिषद अध्यक्ष शरद गवई, आ. गोपीकिशन बाजोरिया, आ. हरीश पिंपळे, आ. रणधीर सावरकर, आ. प्रकाश भारसाकळे आणि जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
‘आरओ प्लांट’सह सांस्कृतिक भवनासाठी मिळणार निधी
By admin | Published: January 30, 2015 1:40 AM