अकोला: कॉटन सिटी म्हणून ओळख असलेल्या अकोल्यात कापसावर आधारित प्रक्रिया उद्योग उभारणीला चालना देण्यात येणार असून, अकोला शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे दिली. जिल्हा प्रशासनामार्फत अकोला क्रिकेट क्लब मैदानावर आयोजित विविध शासकीय इमारतींचे लोकार्पण व भूमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते. अकोला कॉटन सिटी आहे; मात्र कापसाला वाईट दिवस आले. त्यामुळे कॉटन सिटीला सुगीचे दिवस आणण्यासाठी कापसावर प्रक्रिया उद्योग सुरू करण्याची आवश्यकता आहे. त्याकरिता आ. रणधीर सावरकर यांनी सुचविल्यानुसार नीळंकठ सहकारी सूतगिरणी सुरू करण्यासाठी एनसीडीकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. तसेच अकोल्यात कापसावर आधारित प्रक्रिया उद्योग सुरू करण्याचे प्रयत्न करण्यात येणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. प्रशासनाच्या आय लव्ह माय अकोला संकल्पनेचे कौतुक करीत, मी कचरा करणार नाही आणि दुसर्याला करू देणार नाही या मानसिकतेतून शहरात स्वच्छतेचे काम होणार आहे. शहराला स्वत:चे घर समजून स्वच्छतेचे महत्त्व ओळखून, नागरिकांनी पुढाकार घ्यावा, तरच परिवर्तन होणार असल्याचे ते म्हणाले. अकोला शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी अमृत योजनेंतर्गत २00 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याचे स्पष्ट करीत, सांडपाणी आणि कचरा व्यवस्थापनाची योजना मार्गी लावण्याचे आवाहन त्यांनी केले. सरकार अकोल्याच्या पाठीशी असून, शहराच्या विकासासाठी निधीची कमी पडू देणार नाही, अशी ग्वाहीदेखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली.
विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही!
By admin | Published: February 12, 2016 2:18 AM