कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरासह जिल्ह्यातील काेराेना रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. दरराेज ३००-४०० पेक्षा अधिक काेराेनाबाधित आढळत आहेत. मृतांचाही आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. यात वृद्धांसाेबतच तिशीतील रुग्णांनाही मृत्यूने कवटाळले आहे. मृतांचा वाढता आलेख धडकी भरवणारा ठरत आहे. अकोला शहरात उपचार घेणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याने मृतांवर अकोला शहरातच अंत्यसंस्कार केले जात आहेत. मृतांवर शहरातील मोहता मिल स्मशानभूमी, सिंधी कॅम्प, गुलजारपुरा, मोठी उमरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. मंगळवारी अकोला शहरात एकाच दिवसात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या तब्बल ३४ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या मृतांमध्ये अकोला जिल्ह्यासह बुलडाणा, अमरावती, नागपूर, वाशीम जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचाही समावेश आहे. याआधी २४ रुग्णांवर एकाच दिवशी अंत्यसंस्कार झाले होते.
--बॉक्स--
येथील रुग्णांवर अंत्यसंस्कार
अकोला शहर १९
अकोला ग्रामीण ७
बुलडाणा, वाशीम व इतर जिल्हे ८
--कोट--
अकोला जिल्ह्यात मृत्यू होणाऱ्या कोरोना रुग्णांमध्ये बाहेरगावावरून आलेल्या रुग्णांचाही समावेश आहे. दिवसेंदिवस परिस्थिती भयावह होत चालली आहे. यामध्ये संपूर्ण टीम पूर्ण क्षमतेने काम करीत आहे.
- जावेद झकेरिया, अध्यक्ष, कच्छी मेमन जमात
--कोट--
शुक्रवारी कोविडग्रस्त ३४ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यामध्ये शहरातील तब्बल १९ जण, ग्रामीण व इतर जिल्ह्यातील १५ अशा ३४ जणांचा समावेश आहे. यामध्ये बाहेर जिल्ह्यातील ८ मृतांचा समावेश आहे.
- प्रशांत राजूरकर, विभाग प्रमुख, स्वच्छता व आरोग्य विभाग, मनपा