अकोला: सतत पावसात भिजल्यानंतर कानात ओलावा राहिल्यास किंवा अन्य कारणांनी कानांना बुरशी, बॅक्टेरियाचा धोका निर्माण होतो. त्यामुळे बहिरेपणाला सामोरे जाण्याची वेळ ओढवू शकते, पण घाबरून जाण्याचे कारण नाही, या बुरशीचा आणि म्युकरमायकोसिसचा काहीही संबंध नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराला सामोरे जावे लागत आहे. मात्र, दरवर्षी पावसाळ्यात अनेकांना कानाच्या बुरशीच्या त्रासाला सामोरे जावे लागते. सुदैवाने ही बुरशी फक्त कानापुरतीच मार्यादित राहते. शरीराच्या अन्य कोणत्याही भागाला त्याचा कुठलाही त्रास होत नाही, परंतु कान हा मानवी शरीराचा अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. त्याला काही त्रास झाल्यास त्याचा परिणाम थेट आपल्या ऐकू येण्याच्या क्षमतेवर होतो. बुरशी, बॅक्टेरियामुळे कान दुखतो व कमी ऐकू येणे किंवा बहिरेपणाला सामोरे जाण्याची वेळ ओढावू शकते.
काय घ्याल काळजी?
पावसात भिजल्यानंतर, आंघोळ केल्यानंतर कानात ओलावा राहतो. कान कोरडे करण्याकडे दुर्लक्ष होते. कानात ओलावा राहणार नाही. याची काळजी घेतली पाहिजे. कान नेहमी साफ ठेवले पाहिजेत. कानात कोणत्याही कारणासाठी काडी किंवा इतर साहित्य घालता कामा नये.
हेडफोन वापरताना त्याचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण केले पाहिजे. इतरांचे हेडफोन वापरणे शक्यतो टाळावे.
पावसाळ्यात ओलाव्यामुळे धोका
पावसात सतत भिजल्यामुळे कानांना बुरशीचा, बॅक्टेरियाचा धोका वाढतो. अशा वेळी कानात पू होणे, कान गच्च होणे, सतत दुखणे असा त्रास होतो.
वेळीच उपचार घेण्याकडे दुर्लक्ष केल्यास कमी ऐकू येणे, बहिरेपणा येणे, कानाचा पडदा फाटणे, असा धाेका नाकारता येत नाही. त्यामुळे कानाचे कोणतेही दुखणे अंगावर काढता कामा नये.
म्युकरमायकोसिसचा संबंध नाही
कानातील बुरशीचा आणि म्युकरमायकोसिसचा काहीही संबंध नाही. पावसाळ्यात नेहमीच अनेकांच्या कानांना संसर्ग होतो. ही साधी बुरशी असते. ती शरीराच्या आतमध्येही जात नाही. सर्दी, खोकला होतो. तेव्हाही काहींमध्ये संसर्ग कानात जातो.
- डॉ.पराग डोईफोडे, नाक, कान, घसा तज्ज्ञ, अकोला