अकोला : अकोला-अकोट रोडवरील पेट्रोल पंपाजवळील गोदामाला सोमवार, ३१ मे रोजी दुपारी अचानक आग लागली. या आगीत गोदामाच्या दोन भागांत ठेवण्यात आलेले भंगार व फर्निचर जळून खाक झाले आहे. या आगीत गोदाम मालकासह दोन्ही भाडेकरूंचे सुमारे ४५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गोदामानजिक पेट्रोल पंप असल्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती.
स्थानिक तेलीपुरा परिसरातील रहिवासी मोहम्मद शारीक मोहम्मद सलीम गुलशन पतंगवाले यांचे अकोट-अकोला रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळ भव्य गोदाम असून, ते दोन भागांत विभागलेले आहे. त्यापैकी एक भाग समीर खान मौज्जम खान आणि साबिर खान इस्माईल खान (रा. बैदपुरा) यांना भाड्याने दिला होता. गोदामाच्या एका भागात समीर खान यांचे भंगार ठेवले होते, तर दुसऱ्या भागात साबिर खान यांनी फर्निचर व लाकूड ठेवले होते.
सोमवारी दुपारी गोदामातून अचानक धूर येत असल्याचे पाहून परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती अकोट फैल पोलीस ठाण्यासह अग्निशमन विभागाला देण्यात आली. अग्निशमन विभागाची गाडी येण्यापूर्वी घटनास्थळी जमलेल्या जमावाने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र, आगीने रौद्ररूप धारण केले होते. या आगीत गोदामातील भंगार (प्लास्टिक, कार्टून) आणि फर्निचर जळून खाक झाले. बऱ्याच परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. या आगीमुळे समीर खान मौज्जम खान आणि साबिर खान यांचे प्रत्येकी १० लाख आणि गोदाम मालक मोहम्मद शरीक यांचे २५ लाख रुपये, असे एकूण ४५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.
(फोटो)