तेल्हारा: शहरात बीएसएनएल तसेच इतर मोबाईल कंपन्यांचे नेटवर्कअभावी गत अनेक महिन्यांपासून ग्राहक त्रस्त झाले आहेत. मोबाईल सेवा तासनतास खंडित होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
शहरात दैनंदिन कामांसाठी ग्रामीण भागातून शेकडो नागरिक दाखल होतात. त्यामध्ये तहसील कार्यालय, बँका, दुय्यम निबंधक कार्यालय, ऑनलाईन क्लास, एलआयसी सेंटर, तलाठी कार्यालय, सेतू यासह अनेक सेवा देणारी ऑनलाइन केंद्र नेटवर्कअभावी बंद पडत आहेत. त्यामुळे नागरिकांना दिवसभर कनेक्टिव्हीटीची प्रतीक्षा करीत ताटकळत बसावे लागत आहे. कनेक्टीव्हीटी मिळत नसल्याने बँक व शासकीय कार्यालयांसमोर गर्दी होत असल्याने कोरोनाची भीती वाढली आहे. तसेच दिवसभरही काम होत नसल्याने नागरिकांना खाली हात परतावे लागते. त्यामुळे नागरिकांना नाहक आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन मोबाईल सेवा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.