अकोला : जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत एक हजार ७४१ जागांसाठी १५ जानेवारी रोजी मतदानप्रक्रिया शांततेत पार पडली. यासाठी जिल्ह्यातील ८५१ मतदान केंद्रांमध्ये मतदान झाले. जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळच्या सुमारास नवमतदारांमध्ये उत्साह दिसून आला. दुपारी ३.३० वाजेपर्यंत ५८.७० टक्के मतदान झाले होते. यामध्ये सर्वात जास्त तेल्हारा तालुक्यात ६२.३४ टक्के मतदान झाले.
---------------------------------------
अकोट तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींमध्ये मतदान शांततेत
अकोट : तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींसाठी शांततेत मतदान पार पडले. यामध्ये ७०५ उमेदवारांचे भाग्य मशीन बंद झाले आहे. सकाळी संथ गतीने सुरू झालेल्या मतदानाचा वेग दुपारनंतर वाढला. काही गावात अंधार पडल्यानंतरही मतदान सुरूच होते. दुपारी ३.३० वाजेपर्यंत ५६. ८३ टक्के मतदान झाले.
तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींमध्ये २७८ जागांसाठी ११८ मतदान केंद्रांत मतदान घेण्यात आले. दुपारी ३.३० वाजेपर्यंत ६३ हजार ९३३ मतदारांपैकी ३६ हजार ३३३ मतदारांंनी मतदान केले. यावेळी मतदानाची टक्केवारी ५६.८३ झाली होती. तालुक्यातील मंचनपूर, कोहा व लाडेगाव या तीन ग्रामपंचायतींची निवडणूक अविरोध झाली आहे. अनेक गावात दिव्यांग, वयोवृद्ध मतदारांनी मतदान हक्क बजावला. ग्रामपंचायत निवडणूक गावात प्रतिष्ठेची असल्याने घरातून मतदारांना काढण्यासाठी कार्यकर्ते जोमाने भिडले होते. विशेष म्हणजे बाहेरगावी राहायला असलेल्या मतदारांनी गावात पोहोचून मतदानाचा हक्क बजावला. काही मतदार तर पुणे, मुंबईहून मतदानासाठी गावात पोहोचले होते. मतदान प्रकियेमध्ये अडचणी दूर करण्यासाठी मास्टर ट्रेनर म्हणून पाच तलाठी, तर क्षेत्रीय अधिकारी म्हणून ३ मंडळ अधिकारी तसेच ४७६ कर्मचारी गुंतले होते. मतदान केंद्रांत कोरोनाचा पार्श्वभूमीवर मतदारांचे तापमान व ऑक्सिजन लेव्हल मीटर तसेच सॅनिटायझर ठेवले होते. काही गावात मतदान वेळ संपण्यापूर्वी मतदारांची गर्दी झाल्याने त्यांना मतदार केंद्रात घेऊन मतदानापासून कोणालाही वंचित ठेवण्यात आले नाही. मतदान झाल्यानंतर मतदान केंद्रावरून एसटी महामंडळाच्या दहा बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. या बसेसने मतदान यंत्रे व कर्मचाऱ्यांना कास्तकार भवन या ठिकाणी आणण्यात आले. निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन ठाणेदार ज्ञानोबा फड व पोलीस कर्मचारी तैनात होते. मतदानप्रक्रियेकरिता उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे, तहसीलदार नीलेश मडके, नायब तहसीलदार नरसय्या कोंडागुले, हरिश गुरव यांनी कामकाज सांभाळले. (फोटो)