मूर्तिजापूर : गाडगेबाबा यांचे ‘अहिंसा परमो धर्म’ या तत्त्वाशी एकनिष्ठ राहून त्यांच्या ‘ग्लोबल विस्तारा’च्या आलेखात खंड न पडू देता दादरच्या (मुंबई) धर्मशाळेचे व्यवस्थापक प्रशांत देशमुख या अवलियाने व्रतस्थपणे धर्मशाळेत लाखो कॅन्सर रुग्णांना व नातेवाइकांना हक्काचे छत्र उपलब्ध करून दिले. देशभरात गाडगेबाबांच्या कार्याची ओळख करून दिली. ऐन तारुण्यात त्यांनी स्वत:ला बाबांच्या सेवेत वाहून घेतल्यावरही सरकारने त्यांची दखल घेतली नाही. त्यामुळे त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्याची मागणी होत आहे.
प्रशांत देशमुख हे दादरच्या (मुंबई) संत गाडगे महाराज धर्मशाळेचे व्यवस्थापक आहेत. ते गाडगेबाबांच्या सेवेचा वसा चालवतात. मुंबई येथील टाटा ट्रस्टच्या कॅन्सर रुग्णालयात देशाच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण उपचारासाठी येतात. या कॅन्सरग्रस्त रुग्णांची या धर्मशाळेत निवासाची व्यवस्था अल्प दरात केली आहे. परदेशी बँकेतील गल्लेलठ्ठ वेतनाला लाथ मारून प्रशांत देशमुख यांनी धर्मशाळेत सेवक म्हणून कार्य करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते निष्कामपणे रुग्णांची सेवा करत आहेत. भारतभर गाडगेबाबांचा विचार पेरण्यास त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, मथुरा, वृंदावन, महाराष्ट्र यासह देशाच्या विविध राज्यांत त्यांच्याकडून गाडगेबाबांचे कार्य अविरतपणे सुरू असतानाही सरकारकडून त्यांच्या या कार्याची योग्य ती दखल न घेण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
.....
कॅन्सरमुक्त भारत अभियान
प्रशांत देशमुख यांनी कॅन्सरमुक्त भारत अभियान तीन वर्षांपासून राबवण्यास सुरुवात केली. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश येथे या अभियानाला लोकसहभागातून मोठे पाठबळ मिळाले. स्थानिक स्वराज्य संस्था, शासन त्यांना या उपक्रमासाठी मदत करतात. याच माध्यमातून गाडगे महाराजांनी सांगितल्याप्रमाणे व्यसनमुक्तीच्या संदेशाचा प्रचार-प्रसार केला जातो. संत गाडगेबाबा रुग्ण सहाय्यता तथा मार्गदर्शन केंद्रही प्रशांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आले.
.............................
अभियानाला प्रतिसाद
कॅन्सरच्या आजारातून पूर्णपणे बरे झालेले रुग्ण या केंद्रावर स्वानुभवातून इतरांना देशमुख हे मार्गदर्शन करतात. दार्जीलिंग, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बुंदेलखंड, आग्रा, फिरोजाबाद, वृंदावन, मथुरा येथे त्याला प्रतिसाद मिळत आहे; तर गाडगेबाबांच्या नावाने फिरोजाबाद येथे कॅन्सर रुग्णालय उभारण्याचाही मानस तेथील स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे.