लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महापालिकेच्या शिक्षण विभागाचा ढेपाळलेला कारभार ताळ्य़ावर आणणारे उपायुक्त (विकास) समाधान सोळंके यांच्यावर मालमत्ता पुनर्मूल्यांकनाची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षण विभागावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सुरेश सोळसे यांना निर्देश दिले आहेत. यापुढे ‘जीएडी’च्या माध्यमातून शिक्षण विभागाचा कारभार चालणार असल्याने शिक्षण विभागातील मनमानी बदल्या व पदोन्नती प्रक्रियेचा फास अधिकच घट्ट आवळला जाणार असल्याचे चित्र समोर आले आहे. महापालिकेच्या शिक्षण विभागातील कर्मचार्यांचे किस्से व भ्रष्ट कामकाजाची चर्चा मोठय़ा चवीने केली जाते. मनपा शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांचा कोणी वाली नसल्यामुळे शिक्षण प्रणालीत सुधारणा करण्यासाठी या विभागातील निष्क्रिय अधिकार्यांनी कधीही ठोस निर्णय घेतल्याचे ऐकिवात नाही. बदल्यांच्या माध्यमातून स्वत:चे उखळ पांढरे करून घेणार्या शिक्षक संघटनांनी सुद्धा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेकडे दुर्लक्ष केले. सर्व शिक्षा अभियानच्या माध्यमातून चिमुकल्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, औषधी, दिव्यांग विद्यार्थ्यांना अत्यावश्यक साहित्य वाटपातही अनियमितता करणार्या शिक्षण विभागाला भ्रष्टाचाराची वाळवी लागल्याचे निदर्शनास येताच महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी या विभागाला ताळ्य़ावर आणण्याचा निर्णय घेतला. यासाठी मनपा उपायुक्त समाधान सोळंके यांच्याकडे जबाबदारी सोपवली. उपायुक्त सोळंके यांनीसुद्धा एकाच शाळेवर मागील १५ ते २0 वर्षांपासून ठाण मांडणार्या शिक्षकांची बदली करण्याचा निर्णय घेतला. २0१५-१६ मध्ये ७८ शिक्षकांच्या बदल्या करीत शिक्षण विभागाच्या मुळावर घाव घातला. २0१७-१८ मधील चालू आर्थिक वर्षात दहा वर्षांपासून एकाच शाळेवर कार्यरत राहणार्या ७६ शिक्षकांची उचलबांगडी करीत शिक्षण विभागातील भ्रष्ट प्रवृत्तींना चाप लावला. विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी झाल्याची सबब पुढे करून मनपा शाळांचे समायोजन करण्याच्या विचित्र प्रकाराला आळा घालण्यासाठी आयुक्त अजय लहाने, उपायुक्त सोळंके यांनी ऑगस्ट महिन्यापासून मनपा शाळेत नर्सरी, केजी-१, केजी-२ चे वर्ग सुरू केले. त्यासाठी ३३ शाळांमध्ये ३३ शिक्षणसेविका व त्यांच्या मदतीला ३३ मदतनीस यांची भरती प्रक्रिया राबवली. शिक्षण विभागाला ताळ्य़ावर आणल्यानंतर उपायुक्त समाधान सोळंके यांच्याकडे मालमत्ता पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया राबवून मनपाच्या उत्पन्नात वाढ करण्याची अतिरिक्त जबाबदारी दिल्यामुळे शिक्षण विभागाचे कामकाज मनपा उपायुक्त (साप्रवि) सुरेश सोळसे यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय आयुक्त अजय लहाने यांनी घेतला आहे.
शिक्षण विभागाचे कामकाज बर्यापैकी ताळ्य़ावर आले असले, तरी अद्यापही सुधारणेसाठी वाव आहे. या विभागाच्या कामकाजावर लक्ष असून, नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी ‘जीएडी’कडे सोपवली आहे. -अजय लहाने, आयुक्त मनपा