तेल्हारा : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यूपीएससी) घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षांचा निकाल घोषित झाला असून, अकोला जिल्हय़ातील तेल्हारा येथील श्रीकांत सुरेश खोटरे या विद्यार्थ्याने अवघ्या २३ व्या वर्षी ही परीक्षा उत्तीर्ण करून शिक्षण क्षेत्रात जिल्हय़ाचे नाव उज्ज्वल केले आहे. कोणत्याही प्रकारची शिकवणी न लावता घरी अभ्यास करून पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण होणारा श्रीकांत हा जिल्हय़ातील एकमेव विद्यार्थी ठरला आहे.श्रीकांत हा तेल्हारा तालुक्यातील खापरखेड येथील रहिवासी तसेच हल्ली तेल्हारा येथे वास्तव्यास असलेले शिक्षक सुरेश खोटरे यांचा मुलगा आहे. वर्ष २0१४ मध्ये घेण्यात आलेल्या यूपीएससी परीक्षेत त्याने घवघवीत यश मिळविले आहे. देशभरातील गुणवत्ता यादीत त्याने ७२४ वा क्रमांक मिळविला आहे. श्रीकांतचे प्राथमिक शिक्षण तेल्हारा येथील सेठ बन्सिधर विद्यालयात झाले. अकोला येथील जागृती विद्यालयातून त्याने बारावी उत् तीर्ण केली. त्यानंतर श्रीकांतने पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून इलेक्ट्रॉनिक्स अँन्ड टेलिकम्युनिकेशनची पदवी मिळविली. त्यानंतर त्याने यूपीएससीची तयारी सुरू केली व पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण केली. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.*जिद्द असेल तर काहीच अशक्य नाही - श्रीकांतग्रामीण भागातील विद्यार्थी आयएएस किंवा आयपीएस होऊ शकत नाहीत, असा लोकांचा समज आहे. परंतु, जिद्द व चिकाटी असेल, तर ग्रामीण भागातील विद्यार्थीही आयएएस, आयपीएस होऊ शकतात. त्यासाठी कठोर मेहनत व चिकाटीची गरज आहे. अभ्यासाच्या जोरावर ग्रामीण विद्यार्थी कोणत्याही पदावर जाऊ शकतात, असे मत श्रीकांतने व्यक्त केले. यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करायचे हे माझे सुरुवातीपासूनच ध्येय होते. त्यानुसार मी अभ्यास केला. परीक्षा दिल्यानंतर गुणवत्ता यादीत झळकण्याची खात्री मला होती. आता यापुढे मी आयएएससाठी प्रयत्न करणार आहे, असेही श्रीकांतने सांगितले.
तेल्हा-याच्या श्रीकांतची ‘यूपीएससी’त गगनभरारी
By admin | Published: July 06, 2015 1:25 AM