अकोला : गायगाव पेट्रोल डेपोसाठी पेट्रोल घेऊन आलेल्या रेल्वे वॅगनमधून पेट्रोलची चोरी करणाºया टोळीचा उरळ पोलिसांनी बुधवारी पहाटे पारस रेल्वे स्थानकावर पर्दाफाश केला. या टोळीचा गत अनेक वर्षांपासून हा गोरखधंदा सुरु होता. ठाणेदार सतीष पाटील यांनी पदभार स्विकारल्यानंतर पहिलीच मोठी कारवाई करीत पेट्रोल माफीयांना पळता भुई थोडी केली आहे. कारवाईमूळे पेट्रोल चोरणाºया टोळयांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.बाळापूर तालुक्यातील पारस रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या रेल्वे वॅगनमधून पेट्रोलची चोरी करण्यात येत असल्याची माहिती उरळचे ठाणेदार सतीष पाटील यांना मिळाली. त्यांनी पथकासह पारस रेल्वे स्टेशन परिसर गाठून या ठिकाणी सापळा रचला, मंगळवारी रात्रीपासून या टोळीवर पाळत ठेवल्यानंतर टोळीतील सहा जन पेट्रोलच्या चोरीसाठी पुढे येताच त्यांना पेट्रोल चोरतांना रंगेहाथ अटक करण्यात आली. या टोळीतील साहेब खान समशेर खान (२७), सुधाकर भिकाजी रणवरे(४८), अक्षय प्रकाश आगरकर (२०), रुपेश रमेश भाकरे (१९), गणेश रामकृष्ण भाकरे (४३), शिवहरी प्रकाश भाकरे (२८) सर्व रा. गायगांव या सहा पेट्रोल चोरटयांना रंगेहाथ अटक केली. त्यांच्याकडून काळ्या रंगाची एम एच ०१ एसी ०५३५ क्रमांकाची दोन लाख ५० हजार रुपयांची कार, कारमध्ये पेट्रोलने भरलेल्या ३० लिटरच्या प्लास्टिकच्या १२ कॅन, ३ रिकाम्या कॅन (किंमत ४० हजार ३२० रुपये) व लाल रंगाची सुमारे एक लाख रुपयांची एम एच ३० बी ०७३२ क्रमांकाची जीप व यामधील पेट्रोलने भरलेल्या प्रत्येकी ३० लिटरच्या ०४ कॅन व ५४ रिकाम्या कॅन, दोन पाईप असा एकूण ४ लाख ४३ हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाची माहिती ठाणेदार सतिश पाटील यांनी भारत पेट्रोलियम गायगांवचे कार्यपालन अधिकारी गोविंदकुमार मुंदडा यांना दिली. मुंदडा यांनी साडेतीन वाजता घटनास्थळ गाठून उरळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरुन पोलिसांनी गुन्हे दाखल करून आरोपींना अटक केली आहे. मात्र घटनास्थळावरून तीन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले असून उरळचे ठाणेदार सतीष पाटील त्यांचा शोध घेत आहेत.