अकोला : बाळापूर तालुक्यातील पारस येथील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजूर घरकुलाचा दुसरा हप्ता देण्याकरिता कंत्राटी तत्त्वावर असलेल्या जिओ टॅगिंग इंजिनिअर स्नेहा म्हैसणे हिने तीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी तिला अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी अटक केली.
पारस येथील ४२ वर्षीय तक्रारदार हे मोलमजुरी करतात. त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकूल मंजूर करण्यात आले आहे. बांधकाम सुरू केल्यानंतर पहिला हप्ता त्यांना देण्यात आला. त्यानंतर दुसरा हप्ता देण्यासाठी कंत्राटी तत्त्वावर असलेली जिओ-टॅगिंग इंजिनिअर नेहा उत्तमराव म्हैसणे हिने दुसऱ्याच्या बांधकामाजवळ उभे राहून छायाचित्र काढून देण्याचे प्रोत्साहन दाखवून तीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. मात्र तक्रारकर्त्यास लाच देणे नसल्याने त्यांनी या प्रकरणाची तक्रार अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १९ मे रोजी पडताळणी केली असता स्नेहा म्हैसणे हिने लाच मागितल्याचे समोर आले. यावरून तिच्याविरुद्ध बाळापूर पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख शरद मेमाने व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी केली.
कंत्राटी अभियंत्यांचा हैदोस
जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजूर घरकुलांचा हप्ता देण्यासाठी जिओ टॅगिंग कंत्राटी अभियंत्यांची मंजुरी आवश्यक आहे. याचाच गैरफायदा घेत कंत्राटी तत्त्वावर असलेल्या जिओ-टॅगिंग अभियंत्यांनी जिल्हाभर हैदोस घातला आहे. यापूर्वीदेखील तीन ते चार जिओ-टॅगिंग अभियंत्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर काही जण लाचखोरी प्रकरणात अडकले आहेत. आता पुन्हा एकदा एक महिला अभियंता लाचखोरी प्रकरणात अडकली आहे.