अकोला : संत गजानन महाराजांच्या पालखीचे शनिवारीसुद्धा भाविकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. ‘गण गण गणांत बोते’च्या जयघोषाने राजराजेश्वर नगरी भक्तिमय होऊन गेली होती. अकोलेकर भाविक गजानन माउलीच्या दर्शनाने धन्य झाले. शनिवारी सकाळी हरिहरपेठेतील मुक्काम आटोपून श्रींची पालखी व वारकऱ्यांनी रिमझिम पावसातच पंढरपूरला जाण्यासाठी भाविकांचा निरोप घेतला.‘श्रीं’च्या पालखीने परिक्रमा करीत शुक्रवारी सायंकाळी पालखी मुक्कामासाठी हरिहरपेठेतील शिवाजी विद्यालयात पोहोचली. या ठिकाणी पालखीचे भावपूर्ण स्वागत करण्यात आले. श्रींच्या दर्शनासाठी जुने शहरातील हरिहरपेठ, वाशिम बायपास, बाळापूर नाका परिसरात हजारो भाविकांनी गर्दी केली होती. या ठिकाणी आयोजकांच्यावतीने भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. शनिवारी रिमझिम पावसाला सुरुवात झाल्यानंतरही सकाळी पालखीतील वारकºयांनी पंढरपूरकडे जाण्याची तयारी सुरू केली. पहाटेपासूनच टाळ-मृदंग आणि भजनांना प्रारंभ होऊन वातावरण भक्तिमय झाले होते. चहा, अल्पोपाहार आटोपून पालखीतील वारकरी पातूर मार्गे पंढरपूरकडे मार्गस्थ झाले. (प्रतिनिधी)